
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाचे प्रवक्तेपद स्वीकारले असेल, तर तसे सांगावे, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना लगावला. तसेच फडणवीस निवडणूक आयोगाची सातत्याने बाजू का मांडत आहे, तेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाचे प्रवक्तेपद स्वीकारले असेल, तर तसे सांगावे. पूर्ण देशभरातील विरोधी पक्षांना आपली फसवणूक झाली आहे, असे वाटत असून विरोधी पक्ष एकवटला आहे आणि ही लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या लाभार्थ्यांपैकी देवेंद्र फडणवीस एक आहेत. निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील फडणवीस एक लाभार्थी आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यांच्याकडे चोरीचा माल असल्याने त्यांनी गप्प राहायला हवे. नितीन गडकरी यांच्या मतदारसंघात साडेतीन लाखांची मतचोरी झाली आहे. त्यांच्या भाच्याचे नावही मतदार यादीतून वगळण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबातील अनेकांची नावे कापण्यात आली होती. याचा अर्थ गडकरी यांनाही कोणालातरी पाडायचे होते, त्यांना खड्ड्यात घालायचे होते. गडकरी यांच्या मतदारसंघात असे झाले असेल, तर विरोधी पक्षांच्याबाबत काय झाले असेल, याचा विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतही घोटाळे झालेले आहेत, फडणवीस यांच्या अभ्यास गेल्या काही दिवसांपासून घसरलेला आहे. नवीन सरकारमुळे ते गोंधळले आहेत. राहुल गांधी यांचे विधान त्यांनी पुराव्यांसह ऐकले असेल तरीही ते अशी विधाने करत असतील, तर त्यांच्यावर उपचाराची गरज आहे. लोकसभेलाही 50 ते 60 मतदारसंघात घोटाळा झाला, त्यामुळे मोदी पंतप्रधान होऊ शकले, हे राहुल गांधी यांचे विधान फडणवीस यांनी सोयीस्करपणे ऐकलेले नाही. लोकसभेला 60 जागा चोरल्यामुळे मोदी पंतप्रधान झाले, हे फडणवीस यांना माहिती आहे, त्यामुळे चोरांची बाजू चोर घेणारच, असे ते म्हणाले.