
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय महिला वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी महिला क्रिकेटचे जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याचा आणि आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार हिंदुस्थानी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला. ‘हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी जे स्वप्न पाहताहेत ते पूर्ण करायचेय. पराभवाची मालिका खंडित करायचीय आणि देशासाठी काही खास करायचेय,’ असे हरमनप्रीत वर्ल्ड कप ट्रॉफी अनावरण सोहळय़ात म्हणाली.
या कार्यक्रमाला माजी कर्णधार मिताली राज तसेच स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्जसह हिंदुस्थानला दोन जगज्जेतेपद मिळवून देणारा युवराज सिंगही उपस्थित होता. 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या महायुद्धापूर्वी हिंदुस्थानी संघ 14 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार असून, ती ‘आत्मपरीक्षणासाठी महत्त्वाची’ असल्याचे हरमनप्रीत म्हणाली.
2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत केलेल्या 171 धावांच्या खेळीच्या आठवणी ताज्या करताना ती म्हणाली, ‘तो डाव माझ्यासाठी आणि महिला क्रिकेटसाठी टार्ंनग पॉइंट ठरला. अंतिम फेरी गमावूनही परतीच्या प्रवासात लोकांच्या स्वागताने आम्ही अक्षरशः भारावून गेलो होतो.
आज वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे अनावरण आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्या उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्जही उपस्थित होती. या दोघींनी आपल्या मानसिकता आणि दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाल्याचेही सांगितले तर मितालीने 2017 चा विश्व कप महिला क्रिकेटसाठी महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे नमूद केले. आयसीसी सीईओ संजोग गुप्ता यांनी या विश्व कपामुळे महिला क्रिकेटला नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.