
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन-मटणची दुकाने बंद ठेवण्याचा फतवा काढला आहे. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने एकतर्फी घेतलेल्या आदेशाविरोधात कल्याण, डोंबिवलीसह राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. केडीएमसीच्या या निर्णयाला महाराष्ट्र राज्य चिकन मटण असोसिएशनने कडाडून विरोध करत आवाज उठवला आहे. स्वातंत्र्यदिनी चिकन मटण विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा 15 ऑगस्टला केडीएमसीच्या गेटवरच दुकाने थाटून कोंबड्या-बकऱ्या कापण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात चिकन मटण दुकाने, कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेने घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारादेखील केडीएमसीने दिला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य चिकन मटण व्यापारी असोसिएशनने विरोध केला आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. हिंदू खाटिक समाजातील पारंपरिक पिढ्यान्पिढ्या चिकन मटण व्यवसाय करणारे व्यापारी आहेत. ते आपला उदरनिर्वाह या व्यवसायाच्या माध्यमातून करतात. मात्र महापालिकेने काढलेल्या निर्णयामुळे आमच्या पारंपरिक व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न होतोय. याचा परिणाम व्यापारावर, रोजगारावर होत असल्याची कैफियत व्यावसायिकांनी
अधिकाऱ्यांसमोर मांडली.
स्वातंत्र्यदिनी चिकन व मटण विक्री बंद ठेवून आमच्या पोटावर पाय देऊ नका, हा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी पालिका मुख्यालयाच्या गेटवरच चिकन मटण विक्रीची दुकाने सुरू करून पालिकेच्या आदेशाचा निषेध नोंदवण्यात येईल, असा इशारा असोसिएशनच्या वतीने शिरीष लासुरे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
जनतेच्या समस्यांकडे आधी लक्ष द्या!
कल्याण, डोंबिवली शहरात रस्त्यातील खड्डे, अनधिकृत बांधकामे, स्टेशन परिसरातील बेकायदा फेरीवाले, वाहतूककोंडी, पाणीटंचाई अशा बऱ्याच समस्या आहेत. जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका लक्ष देत नाही. मात्र नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रशासन भलत्याच विषयात रस दाखवते, असा संतापही व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला.
आदेशामागे कुणाचे सुपीक डोके?
चिकन-मटण बंदीचा आदेश कोणाच्या सुपीक डोक्यातून आला हे समजत नाही. कोणी काय खायचे आणि कसे जगायचे, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. महापालिकेने असा आदेश देणे योग्य नाही. हे जाणूनबुजून करण्यात आले का, याचीही चौकशी व्हायला हवी. आपल्या देशात प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीचा व खाद्यपदार्थ निवडीचा स्वातंत्र्याचा हक्क आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच हे स्वातंत्र्य हिरावून घेणे हा अन्याय आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.
– दीपेश म्हात्रे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख.