Thane news – 30 प्रवासी घेऊन जाणारी बस दुभाजकाला धडकली

गुजरातच्या गांधीनगर येथून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसला सोमवारी सकाळी घोडबंदरजवळील नागला – बंदर येथे मोठा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस दुभाजकाला धडकली आणि या बसने एका दुचाकीस्वारालाही उडवले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून बसचालक जसवंत सिंग शांतू छावडा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गांधीनगर येथून भिवंडीच्या दिशेने ही खासगी बस चालली होती. यात 30 प्रवासी होते. ही बस नागला बंदर सिग्नल येथे आली असता बसचालक जसवंत सिंग याचे नियंत्रण सुटले आणि ही भरधाव बस घोडबंदरच्या फ्लायओव्हरखालील मोठ्या दुभाजकावर जोरात आदळली. पुढे चाललेल्या एका दुचाकीलाही या बसने उडवले. या अपघातात दुचाकीस्वार रितेश छेडा आणि रेवती यादव हे दोघेही गंभीर जखमी झाले. रितेश याच्या हाताला दुखापत झाली तर रेवती हिच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रोज अपघात.. तासन्तास रखडपट्टी

घोडबंदर मार्गावरून हजारो वाहने, बस ये-जा करतात. गुजरातमधून ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई येथे जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे खासगी बसगाड्यांची या मार्गावर सर्वाधिक वाहतूक असते. परंतु रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूककोंडी अशा कारणांमुळे घोडबंदर मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. त्यातच वडाळा, घाटकोपर, कासारवडवली ते गायमुख अशा चार मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुख्य रस्ता अत्यंत अरुंद झाला असून या मार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्डे यामुळे रोजच अपघात आणि तासन्तास रखडपट्टी यामुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत.