पोलीस डायरी – कस्टम अधिकाऱ्यांना सोडले, फौजदाराला सडवले

>> प्रभाकर पवार, [email protected]

कोल्हापूरच्या विजय कृष्णाजी पाटील या तरुणाची १९९० साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. कोल्हापूरमधील करवीर हे त्याचे पहिले पोलीस ठाणे. खाकी वर्दीतील रुबाबाचा, चैतन्याचा आनंद लुटत असतानाच त्याची रायगड जिल्ह्यात बदली झाली. त्याला श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे इन्चार्ज करण्यात आले. तेव्हापासून त्याच्या अधोगतीचा जो प्रवास सुरू झाला तो अद्याप थांबलेला नाही.

विजय पाटील यांचे ‘सत्यमेव जयते’ हे ३१६ पानी पुस्तक नुकतेच माझ्या हाती लागले. त्यात विजय पाटील यांनी आपल्या आतापर्यंतच्या जीवनाची मांडलेली कर्मकहाणी वाचून मन सुन्न झाले. आपली दुःखी कहाणी सांगताना पाटील म्हणतात, “शनिवार, दि. ९ जानेवारी १९९३ रोजी रात्री १०.३० वाजता मी घरातून निघालो. त्या दिवशी माझा उपवास होता, परंतु तो दिवस माझ्या आयुष्याचे मातेरे करणारा ठरला. मी त्या रात्री माझ्यासोबत नाईट चेकिंगसाठी पोलीस शिपायांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलो. श्रीवर्धन पोलीस ठाण्यापासून २० कि.मी. अंतरावरील गोंडघर फाट्याजवळ आमची जीप पोहोचली तेव्हा एक संशयास्पद ट्रक आम्हाला दिसला. आम्ही त्या ट्रकचा पाठलाग करून अडविले. त्या पाठोपाठ आणखी एक ट्रक आला. त्यालाही आम्ही रोखले व तपासणी केली असता त्यात चांदीच्या विटा आढळून आल्या. आम्ही दोन्ही ट्रक ताब्यात घेतले व श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या दिशेने निघालो असता एक जीप आमच्या दिशेने आली. त्यातील एकाने आम्हाला थांबण्याचा इशारा केला. आम्ही दोन्ही ट्रकसह थांबलो असता कस्टमच्या जीपमधून कस्टम इन्स्पेक्टर जयवंत केशव गुरव उतरले. ते माझ्याजवळ आले व म्हणाले, “पाटीलसाहेब तुम्ही ट्रकमधील स्मगलिंगचा माल जप्त केला तर आम्ही कस्टमवाले अडचणीत येऊ. कृपया तुम्ही कारवाई करू नका. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील.” जयवंत गुरव यांच्या सोबत असलेले उत्तम पोतदार व चाचा नावाचे गृहस्थही विनवणी करू लागले. “माल सोडा, तुम्हाला सरकारकडून फक्त एक लाख रिवार्ड मिळेल. आम्ही आपणास दहा लाख रुपये देऊ. तुम्ही काय करायचे ते ठरवा.” कस्टमचे अधिकारीच तस्करांसाठी दलाली करीत होते. मध्यस्थी करीत होते. मग आपण तरी कशाला जास्त शहाणपणा करावा असा विचार करून जयवंत गुरव व तस्करांच्या (दलालांच्या) ऑफरला मी बळी पडलो व पैसे घेऊन चांदीचे दोन्ही ट्रक सोडून दिले.” आपल्या अपराधाची, मोहाची कबुली देताना विजय पाटील पुढे म्हणतात, “तिथेच घात झाला. स्मगलर टायगर मेमन व त्याच्या साथीदारांनी आमची फसवणूक केली. चांदीच्या विटांमधून एके ५६ रायफल्स, हातबॉम्ब, आरडीएक्स आदी स्फोटकांचा मोठा साठा दिघी व शेखाडी बंदरात उतरवून त्याचे वाटप मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी केले हे कळल्यावर मला प्रचंड धक्का बसला.”

विजय पाटील आपल्या नशिबाला दोष देऊन पुढे म्हणतात, “अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर मुंबईत काहीतरी घडणार आहे, घातपाताची शक्यता आहे असा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला होता व कस्टम अधिकाऱ्यांना सावध राहण्याचे लेखी संकेत दिले होते. परंतु त्याचे गांभीर्य लक्षात न घेता कस्टम अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे स्मगलरांना स्मगलिंगसाठी पैसे घेऊन मुभा दिली. त्यात स्मगलरांच्या कटाची कोणतीही कल्पना नसताना आम्ही भरडले गेलो. अतिरिक्त कस्टम कलेक्टर सोमनाथ थापा, कस्टम अधीक्षक मोहम्मद सय्यद, सहाय्यक कस्टम कलेक्टर रणजित कुमारसिंग, कस्टम इन्स्पेक्टर जयवंत गुरव व माझ्यासह १८९ आरोपींना (मुंबईतील १२ मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणी) अटक करण्यात आली. त्यातील १०० आरोपींना न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी दोषी ठरविले. दहा जणांना फाशीची सजा ठोठावली. काहींना जन्मठेपेची, तर संजय दत्तसारख्या सिने अभिनेत्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ज्या कस्टम अधिकाऱ्यांचा थेट टायगर मेमनच्या दलालांशी, स्मगलिंगशी संबंध होता अशा कस्टम अधिकाऱ्यांनाही कमी शिक्षा ठोठावण्यात आली, परंतु माझ्यासारख्या वारकरी कुटुंबात जन्मलेल्या, संतांची शिकवण असलेल्या व ज्याला बॉम्बस्फोट आरोपीच्या कोणत्याही कटाची माहिती नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याला मात्र न्यायालयाने सडवले. १९९३ साली मला अटक झाली (मधला जामीनकाळ वगळता). तेव्हापासून म्हणजे गेली तीन दशके मी जेलमध्ये आहे. माझ्याविरुद्ध बॉम्बस्फोट कटात सामील असल्याचा कोणताही पुरावा नाही. न्यायालयाने सत्याचा विपर्यास करणारी निरीक्षणे नोंदविली आहेत. न्यायालयाने मला कट आणि मदत करणे या दोन आरोपांखाली दोषी ठरविले. तर दिघी व शेखाडी बंदरातील लैंडिंगमध्ये सहभागी असलेल्या चार कस्टम अधिकाऱ्यांना एकाच गुन्ह्यात दोषी ठरवून त्यांना कमी शिक्षा दिली. हा निकाल तर्काच्या पलीकडचा होता. दिघी पोलीस चौकीमध्ये नेमणुकीस असलेला व बडतर्फ करण्यात आलेला पाटील नावाचा पोलीस शिपाई हा मीच आहे असे समजून माझ्याविरुद्ध टाडा कोर्टाने निकाल दिला. माझी सजा कमी करण्याऐवजी ती वाढविण्यात आली. पाटील नावातील साम्यामुळे मी आजपर्यंत केलेल्या सर्व याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या. अपिलीय न्यायालयाच्या चुकीमुळे मी आज जेलमध्ये खितपत पडून आहे. मी स्मगलिंगचा माल सोडला. त्यासाठी पैसे घेतले हे खरे आहे, परंतु मला शख व स्फोटकांची किंवा बॉम्बस्फोट कटाची माहिती बिलकूल नव्हती. हे कटू सत्य आहे. हवे तर माझी नार्को टेस्ट करा. मी देशद्रोही नाही एवढेच मला सांगायचे आहे.”

शेखाडी व दिघी बंदरावर नियमितपणे स्मगलिंगचा माल उतरविणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांना आठ वर्षांची शिक्षा, तर बॉम्बस्फोट कटाची माहिती नसणाऱ्या पोलीस अधिकारी विजय पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा हे बुद्धीला न पटणारे तर्कविसंगत वाटते. विजय पाटील यांची पैशांच्या मोहापायी आयुष्याची घडी विस्कटली गेली. वैभवशाली जीवनाचे स्वप्न भंगले आणि चिरंतन दुःख पदरी पडले. सारी तारुण्यावस्था, प्रौढावस्था जेलमध्ये संपली. साठी ओलांडलेले विजय पाटील आता जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. तरीही प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देणारी त्यांची पत्नी वृंदा ही आपल्या पतीच्या मुदतपूर्व सुटकेसाठी आजही प्रयत्न करीत आहे. धन्य ती अर्धागिनी.