केडीएमसीचे अजब तर्कट; खाण्यावर नाही, विक्रीवर बंदी, 15 ऑगस्टच्या आंदोलनावर हिंदू खाटिक समाज ठाम

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा फतवा काढला आहे. प्रशासनाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र राज्य चिकन-मटण विक्रेता असोसिएशनने संताप व्यक्त केला आहे. आदेश मागे घ्या, अन्यथा १५ ऑगस्टला केडीएमसीच्या गेटवरच दुकाने थाटून कोंबड्या-बकऱ्या कापण्याचा इशारा दिला आहे. तरीही केडीएमसी आपल्या निर्णयावर ठाम असून खाण्यावर नाही तर विक्रीवर बंदी असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी अजबच तर्कट मांडले आहे. यामुळे संतापलेल्या महाराष्ट्र राज्य चिकन-मटण विक्रेता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी केडीएमसीच्या गेटवरच दुकाने थाटून आंदोलन करण्यावर ठाम असल्याचा पुन्हा एकदा इशारा दिला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून १५ ऑगस्टनिमित्त शहरातील चिकन मटन विक्री दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आले. केडीएमसीच्या या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही केडीएमसीच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदू खाटिक समाज आणि महाराष्ट्र राज्य चिकन मटण विक्रेता असोसिएशनने निर्णय मागे घ्या, अन्यथा पालिकेच्या प्रवेशद्वारावरच चिकन मटण विक्री करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

सर्व थरातून होणारा विरोध लक्षात घेता पालिकेने यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासन हा प्रश्न कसा चिघळेल हेच बघत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी चिकन मटण विक्रीवर बंदी आहे. खाण्यावर बंदी नाही. कुणी संभ्रम निर्माण करू नये असे अजब तर्कट मांडले आहे.

दरम्यान, पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासनाने चिकन मटण बंदीचा निर्णय घेतल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.