दिघ्यात केमिकल लोच्या; कंपन्यांचे सांडपाणी थेट नाल्यात, प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन टँकर पकडले

प्रक्रिया न करताच उघड्यावरील नाल्यात केमिकल कंपनीमधील सांडपाणी सोडणारे दोन टँकर जप्त करण्यात आले आहेत. दिघा परिसरात असणाऱ्या नाल्यात हे केमिकलमिश्रित सांडपाणी आज पहाटे सोडले जात असताना नवी मुंबई महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली.

ग्रीन वर्ल्ड सीएचएस, नेवा भक्ती पार्क आणि न्यू गार्डन सीएचएस, ऐरोली या परिसरात रोज संध्याकाळी उग्र वास येत होता. त्यामुळे घशाला खवखव होणे, कोरडे पडणे, ढास लागणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोकेदुखी, खाज येणे असे त्रास सुरू झाले. आज पहाटे मुकुंद कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या नाल्यात दोन टँकरमधून केमिकलमिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळून आले. हे दोन्ही टँकर जप्त करण्यात आले आहेत.

कारवाई करणारे पथक आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच टँकरचालक टँकर सोडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून गेले. याप्रसंगी मनसे उपशहराध्यक्ष नीलेश बानखिले आणि उत्तम भादवणकर यांच्यासह ग्रीन वर्ल्डचे रहिवासी रामेश्वर गुड्डा, डी. एल. भादवणकर, अरविंद मोरे, वीरसेन कदम, श्रीराम मोहिते आणि अनुराग पटनायक घटनास्थळी उपस्थित होते.