अक्षय कुमारची अडीच कोटींची ‘रेंज रोव्हर’ SUV जप्त, जम्मू-कश्मीरमध्ये वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला जम्मू-कश्मीरमध्ये मोठ्या नामुश्कीचा सामना करावा लागला. ज्या गाडीने अक्षय कुमार कार्यक्रमस्थळी पोहोचला होता ती अडीच कोटी रुपयांची रेंज रोव्हर एसयूव्ही जम्मू-कश्मीर पोलिसांनी जप्त केली आहे. जम्मूमधील कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

अभिनेता अक्षय कुमार मंगळवारी जम्मू-कश्मीरला एका ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन करण्यासाठी गेला होता. जम्मू विमानतळावरून तो खासगी रेंज रोव्हर एसयूव्हीने नवीन शोरूमला पोहोचला. डोगरा चौकात ही गाडी पार्क करण्यात आली होती. मात्र काही वेळातच चंदीगड पासिंग असणारी ही कोट्यवधींची गाडी वाहतूक पोलिसांनी जप्त केली. यावेळी अक्षय कुमार गाडीमध्ये उपस्थित नव्हता. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

कारण काय?

जम्मू-कश्मीरमध्ये कोणत्याही वाहनावर रंगीत काचा किंवा काचांमध्ये कोणतेही बदल करण्याची परवानगी नाही. हा कायदा सर्वांसाठी समान आहे. अक्षय कुमारसाठी आयोजकांनी बूक केलेल्या कारच्या काचांना काळी फिल्म लावण्यात आली होत्या. यामुळे जम्मूतील कायद्याचे उल्लंघन झाले आणि वाहतूक पोलिसांनी कार जप्त केली.

कधी घडला हा प्रकार?

अक्षय कुमार मंगळवारी सायंकाळी शोरूमच्या उद्घाटनासाठी पोहोचला होता. रेंज रोव्हर एसयूव्ही क्रम. सीएच 01 एएल 7766 या गाडीने तो तिथे आला होता. ही गाडी आयोजकांनी त्याच्यासाठी भाड्याने घेतली होती. मात्र या गाडीच्या काचांना काळी फिल्म लावण्यात आलेली होती. ही बाब समोर येताच वाहतूक पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली.