हिमाचल प्रदेशमध्ये चार ठिकाणी ढगफुटी; शिमला-कुल्लूमध्ये परिस्थिती बिकट, घरं, दुकानं, गाड्यांसह पूल वाहून गेले

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असून चार ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे कुल्लू, शिमलासह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नानंटी आणि गानवी भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दोन पूल वाहून गेले, तसेच घरं, गाड्या वाहून गेल्याने मोठी वित्तहानी झाली आहे.

हवामान विभागाने हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आणि चार ठिकाणी ढगफुटी झाली. यामुळे नदी, नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आणि पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसले. यामुळे भीमद्वारी, नांती, पूह, मायाड खोऱ्यात मोठे नुकसान झाले. भीमद्वारी आणि नांदीमध्ये ढगफुटीमुळे अचानक नदीचे पाणी वाढले आणि सहा जण बुडाले. तसेच एक पूलही वाहून गेला.

टिल्ला आणि डोग्रा पुलाचेही पावसामुळे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी बाजारपेठेमध्ये घुसल्याने दुकाने बंद करण्यात आली. कुल्लूतील तीर्थन भागामध्ये पाच वाहने आणि चार घरं वाहून गेली. सुदैवाने घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने जीवितहानी टळली. तसेच करपट गावातील 22 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून पूह येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे आयटीबीपी कॅम्पसाठी डोंगररांगात काम करणाऱ्या कंपनीची यंत्र सामग्रही वाहून गेले. या ठिकाणी पाच कर्मचारीही अडकले होते. त्यांना वाचवण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे हिमाचल प्रदेशमधील दोन राष्ट्रीय महामार्गांसह 323 रस्ते बंद पडले असून अनेक भागात बत्ती गूल झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी योजना ठप्प पडल्या असून पिण्याचे पाण्याचे संकट नागरिकांवर ओढावले आहे. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने बाधित लोकांना 10 हजार रुपयांची अंतरिम मदत जाहीर केली आहे.