‘विनाशकाले विपरीत बुद्धी’! सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून रोहित पवारांची अजित पवार गटावर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र या घटनेला तीन आठवडे होत नाही तोच सूरज चव्हाण यांचे प्रमोशन मिळाले असून राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. अजित पवार गटाचा हा अजब कारभार समोर आल्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’! असे म्हणत टीका केली.

लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं? अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही अजित पवार गटाने घेतलेल्या या निर्णयावर टीका केली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद? छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले. आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. हेच का महाराष्ट्राचे ‘Good Governance?’, असा सवाल दमानिया यांनी केला.

कोकाटेंवरून लातुरात छावा आणि दादा गटात हाणामारी, तटकरेंवर पत्ते फेकले

मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात? छान! पण …… कमालीची बाब म्हणजे, अगदी २ आठवड्या पूर्वी, मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात, याच राष्ट्रवादी पक्षाने, सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यालय येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले आहे. (फोटो खाली जोडला आहे) मग असे अचानक काय झाले? काही महिन्यांपूर्वी ह्याच पक्षाने ‘जन सन्मान यात्रा ‘ काढली होती. दिसला का यांचा जन सन्मान? असा हल्लाबोल दमानिया यांनी केला.