
बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत ‘ठाकरे ब्रॅण्ड’च सरस ठरेल. या निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीला निर्विवाद विजय मिळवून द्यायचा, असा निर्धार गुरुवारी बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना प्रणित ’उत्कर्ष पॅनेल’च्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्याला दोन्ही पक्षांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी परळच्या शिरोडकार हायस्कूल सभागृहात ‘उत्कर्ष पॅनेल’चा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस रंजन चौधरी, कार्याध्यक्ष अॅड. उदय आंबोणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बेस्ट कामगारांच्या पतपेढीतील शिवसेना-मनसे युतीचा विजय हा संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकांमधील विजयाची नांदी ठरणार आहे. या निवडणुकीत सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन ठाकरे बंधूंना बळ द्यावे आणि निवडणूक जिंकून द्यावी, असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी निवडणुकीत ’ठाकरे ब्रॅण्ड’चेच वर्चस्व राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. विरोधकांकडून पैशांचा उपयोग करुन बेस्ट कामगारांना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र बेस्टचे कामगार हा डाव हाणून पाडतील आणि विजयासह ठाकरे बंधूंच्या मार्गदर्शनाखाली बेस्टला पुनरुज्जीवन देतील, असा निर्धार सामंत यांनी बोलून दाखवला.