15 ऑगस्ट 1947 चा ‘दि स्टेट्समन’! स्वातंत्र्याचा साक्षीदार आशुतोष पाटील यांच्या संग्रही!!

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा परमोच्च क्षण असलेल्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ चा साक्षीदार असलेला ‘दि स्टेट्समन’ छत्रपती संभाजीनगरातील पुरातत्त्वज्ञ आणि प्राचीन वस्तुसंग्राहक आशुतोष पाटील यांच्या संग्रही आहे! एमजीएम विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्त्व विभागात सहायक प्राध्यापक असलेल्या पाटील यांच्या संग्रहातील हा ठेवा पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या प्रत्येक क्षणाची रोमांचकारी अनुभूती देणारा आहे.

ऐतिहासिक मथळा

पहिल्या पानावर ठळक अक्षरातील ‘Two Dominions Are Born’ हा मथळा भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या जन्माची घोषणा करणारा! हे शीर्षक केवळ राजकीय बदलाचे प्रतीक नव्हते, तर दीर्घकालीन स्वातंत्र्यलढ्याचा यशस्वी परिपाक होता. या संदर्भातील वृत्तांत, दोन्ही राष्ट्रांच्या स्थापनेची प्रक्रिया, विभाजनाची पार्श्वभूमी तसेच त्यावेळच्या जागतिक प्रतिक्रिया यांचा सविस्तर आढावा या वर्तमानपत्रात घेण्यात आला आहे.

अंकातील प्रमुख बातम्या

१४ ऑगस्टच्या मध्यरात्री बरोबर बाराच्या ठोक्याला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केले. ‘At the stroke of the midnight hour…’ या शब्दांनी सुरू होणारे हे भाषण भारताच्या नव्या मन्वंतराची घोषणा करणारेच होते. आजही जगातील सर्वोत्तम भाषणापैकी नेहरूंचे हे भाषण गणले जाते. पंडित नेहरू यांच्या ऐतिहासिक भाषणातील निवडक उतारे ‘Tryst with Destiny’ या मथळ्याखाली छापण्यात आले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकात्यासह इतर शहरातील जल्लोषाचे वर्णन करणाऱ्या बातम्याही या अंकात आहेत. फाळणीची निश्चिती करणाऱ्या सीमारेषेबद्दल स्वतंत्र बातमी आहे. विशेष म्हणजे त्या काळातील जाहिरातीही पानांवर आहेत.

छपाई व मांडणीची वैशिष्ट्ये

हा अंक पारंपरिक ‘लेटरप्रेस’ छपाईत साकारला असून, कृष्णधवल छायाचित्रे त्या काळातील वातावरण जिवंत करतात. पानांची रचना, स्तंभांची मांडणी, अक्षरशैली आणि जाहिरातींतील कलात्मकताही वाचकांना लुभावणारी आहे.

१५ ऑगस्ट १९४७ च्या अंकाच्या

66 ‘दि स्टेट्समन’चा हा अंक म्हणजे केवळ कागद नसून स्वातंत्र्य चळवळीच्या परमोच्च क्षणाची अनुभूती देणारे माध्यम आहे. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आपण पुस्तकांमधून वाचतो, त्याच लढ्याचा रोमांच या वर्तमानपत्राच्या माध्यमातून अनुभवायला मिळतो. पुढील पिढ्यांना इतिहासाशी जोडणारा तो पूल आहे.
आशुतोष पाटील