मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार; आमची चर्चा सुरू आहे! संजय राऊत

मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये व्यक्त केला. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. आम्हाला माहितीये आम्हाला काय खायचंय, काय प्यायचंय आणि कधी तलवार उपसायची आहे. ती तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे, असा इशाराही संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी भाजपला दिला.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्या-पिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे? ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी खाण्या-पिण्याची बंधनं लादली नव्हती. आज धार्मिक सण नाहीये विजय उत्सव आहे. लोकांनी जे हवं ते खायचं, हवं ते प्यायचं बेधुंद व्हायचं, असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असायला पाहिजे. हा धार्मिक देश होता तो यांनी धर्मांध केला. त्यांनी तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधनं लादली. जसं स्वातंत्र्य दिनी मांस खायचं नाही, मांस विक्री बंद, हा नवीन नियम कोणी आणला? काँग्रेसने कुठे आणला? कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय घेतला असेल. पण त्यात तुम्ही धर्मांधता आणली. खाणारे खाणार, कोणी यांचं ऐकतं का? कत्तलखाने बंद असा निर्णय काँग्रेस काळात झाला असेल. शासकीय सुट्ट्या असतात, त्यात ती एक सुट्टी असते. कत्तलखाने त्यावेळी बंद असतात. देवनारला कत्तलखाना आहे, महानगरपालिकेचा आहे, शासनाची सुट्टी आहे, याच्या पलिकडे काय? या अर्थ तिथे मटण विक्रीला बंदी नाहीये, असे संजय राऊत म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी चिकन, मटणाची दुकानं बंद आहेत. काही ठिकाणी विरोध झाला, आंदोलनही करण्यात आली या प्रश्नावर संजय राऊत यांनी उत्तर दिले.

सन्माननीय राज ठाकरे चुकीचं काय बोलले? मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी, मुंबई तर आहेच. मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत. ठाण्यात आम्ही एकत्र लढू, कल्याण-डोंबिवलीत आम्ही एकत्र लढू. मुंबईसह अशा अनेक महानगरपालिका आहेत. इथे आमची एकमेकांसोबत चर्चा सुरू आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आहे. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी ही मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

 नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशिने प्रयत्न करताहेत की त्यांनी स्वाभिमानाच्या प्रश्नावर लढण्यासाठी उठू नये. मात्र, महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. आम्हाला माहितीये आम्हाला काय खायचंय, काय प्यायचंय आणि कधी तलवार उपसायची आहे. ती तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे, ती उसळून बाहेर येईल. हे भाजपचं काही सांगू नका, असे संजय राऊत यांनी रोखठोक शैलीत फटकारले.

आम्ही कालपासून शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी, शहरातले पदाधिकारी, सगळे जिल्हा प्रमुख, सगळे तालुका प्रमुख, सगळे उपजिल्हा प्रमुख इथे आहेत. जिल्हा परिषद कशा प्रकारे लढवायची? याच्यावर मंथन झालं. आणि आम्ही ताकदीने जिल्हा परिषदा, नगर पंचायती लढू. शहरातला विषय महानगरपालिकेचा तो विषय संपलेला आहे. त्यावर फार चर्चा करण्यात आता आम्ही वेळ घालवणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.