सलग सुट्ट्यांमुळे शिर्डी-शनिशिंगणापूरमध्ये भक्तांचा महापूर; नियोजन कोलमडले, रस्त्यांवर लांबच लांब रागा

गोपाळकाला आणि शनिवार-रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे भक्तांचा महापूर उसळला आहे. यामुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडून पडले आहे. गर्दी, वाहतूक कोंडी, अव्यवस्था आणि स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून भक्तांची उघड लूटही सुरू आहे.

स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यामुळे तसेच श्रावण महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली. प्रचंड गर्दीने शनी मंदिर गजबजून गेले. महाद्वारापासून सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या. शनि मूर्तीच्या दर्शनासाठी चौथऱ्याजवळ भाविकांची वाढती गर्दीमुळे रेटारेटी गडबड गोंधळ उडाल्याने काही प्रमाणात नियोजन कोलमडले.

शनिशिंगणापूरपासून शिर्डीपर्यंत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भक्तांना मंदिर दर्शनासाठी तासन्तास थांबावे लागत असून, लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

शिर्डी व शनिशिंगणापूर परिसरातील खासगी पार्किंगधारकांनी या गर्दीचा गैरफायदा घेतला असून पार्किंगसाठी अव्वाच्या सर्वा दर लावले जात आहे. गाडी पार्किंगसाठी नेहमी 50-100 रुपये असणारा दर आता थेट 500 ते 1000 रुपयांपर्यंत नेण्यात आला आहे. कुठलाही पावती व्यवहार नाही, दराबाबत कुठलीही नियंत्रण यंत्रणा नसून लुटमार सुरू असल्याचा आरोप भक्तांनी केला.

नियोजन कोलमडले

गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता याबाबतचे सर्व नियोजन कोडमडले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून उभ्या गाड्यांच्या रांगा, कचऱ्याचे ढीग, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शौचालयांची दुरावस्था दिसून येत आहे.