इंडिगो विमानाचे शेपूट धावपट्टीला घासले; मुंबईत मोठी दुर्घटना टळली

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे मोठी दुर्घटना टळली. विमानतळावर लॅण्डिंग करताना इंडिगो विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळला. यात विमानाचे किरकोळ नुकसान झाले. विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्यात आले असून सुदैवाने या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. दरम्यान, या घटनेनंतर विमानाला उड्डाणावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. बँकॉकहून मुंबईला येणारे एअरबस ए 321 हे विमान शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास धावपट्टी 27 वर उतरत असताना ही घटना घडली. याबाबत माहिती देताना इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले, 16 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत प्रतिकूल हवामानामुळे कमी उंचीवर उड्डाण करत असताना इंडिगो एअरबस ए 321 विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.