चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरूच; वर्धा नदीला पूर आल्याने तेलंगणाकडे जाणारी वाहतूक थांबली

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून अधेमधे पडणारा पाऊस सोमवारी सलग मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांची त्रेधा उडाली. सखल भागात पाणी साचू लागले असून रस्त्यांवरही पावसाचे पाणी आले आहे. वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा भोयेगाव मार्ग आणि बल्लारपूर राजुरा मार्ग बंद झाला. त्यामुळे तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली. तेलंगणात जाणारा गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा मार्गही बंद झाला आहे.

यवतमाळ आणि आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसाने वर्धा नदीने पात्र सोडले. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत पाऊस नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मार्ग रात्रीपासून बंद पडले. आता चंद्रपुरातही पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातून वाहणाऱ्या इरई नदीला पूर आल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते. इरई नदी वर्धा नदीत विसर्जित होते. पण आता वर्धा नदीचं दुथडी वाहत असल्याने ती इरईला सामावून घेण्याची शक्यता नाही. परिणामी उलटा दाब निर्माण होऊन इरईचे पाणी चंद्रपूर शहरात घुसू शकते. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.