संजय राऊत यांचा लेटर बॉम्ब; 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्यात शिंदे-शिरसाट सामील, दिल्लीच्या ‘बॉस’ला 10 हजार कोटी दिल्याचा गौप्यस्फोट

 

महाराष्ट्रामध्ये 50 हजार कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा करण्यात आला असून यात नगरविकास खाते आणि सिडको सामील आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी किमान 20 हजार कोटी रुपये स्वतःच्या खिशात घातले असून 10 हजार कोटी दिल्लीच्या बॉसला दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार घोषणा देतात की, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’. भ्रष्ट लोकांना वाचवले जाणार नाही त्यांना तुरुंगात टाकले जाईल असे म्हणतात. मात्र वास्तव याच्या उलट असून आपल्या नेतृत्वाखालील तपास यंत्रणा भ्रष्ट व्यक्तींना संरक्षण देत असल्याचे संजय राऊत यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात ठळकपणे नमूद केले आहे.

महाराष्ट्रमध्ये नगरविकास विभाग आणि सिडको 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्यात सामील असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी 20 हजार कोटी रुपये खिशात घातले. यापैकी दहा हजार कोटी रुपये त्यांनी दिल्लीतील ‘बॉस’पर्यंत पोहोचवल्याची उघडपणे बोलले जात आहे. शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख आपण आहात त्यामुळे आपल्यावरही संशय बळावतोय, असे नमूद करत संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात टाकले.

संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा रोहित पवार यांचा आरोप; उद्या सिडकोवर मोर्चा

रायगड जिल्ह्यातील तब्बल 4078 एकर वनजमीन बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आली. गेल्या 30 वर्षांपासून सरकारच्या 12.5 टक्के भूखंड वाटप योजनेनुसार बिवलकर कुटुंब अपात्र होते, मात्र नगरविकास मंत्री आणि सिडको अध्यक्षांनी त्यांना पत्र ठरवले. हा घोटाळा करण्यासाठी शिंदे यांनी फक्त 25 दिवसांसाठी संजय शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदी नेमणूक केली आणि या काळात अत्यंत घाईघाईने जमीन वाटप करण्यात आले.

20 हजार कोटींच्या लाचेमुळे हा व्यवहार पार पडला. त्यामुळे या व्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करून एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि सिडको अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा करावी. तसेच शिंदे आणि शिरसाट यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.