वडाळ्यात बेस्ट बसने मायलेकाला चिरडले

बेस्ट बसने मायलेकाला चिरडल्याची घटना सोमवारी दुपारी वडाळ्यात घडली. 38 वर्षीय लिओबा सेल्वेराज ही महिला 8 वर्षांचा मुलगा अॅन्थनीला शाळेत घेऊन जात होती. दोघे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होते. याचदरम्यान मागून आलेल्या बेस्ट बसने दोघांना जोरदार धडक दिली. बसचा डावीकडील टायर दोघांच्या अंगावरुन गेला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मुलाला रुग्णालयात दाखल करुन घेण्याआधीच मृत घोषित करण्यात आले, तर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सोमवारी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी दादर येथील वीर कोतवाल उद्यान येथून भरणी नाका येथे बस जात होती. वडाळ्यातील सेंट जोसेफ शाळेजवळ बसने मायलेकाला चिरडले. बसचा टायर मुलाच्या डोक्यावर आदळला. त्यात मुलाला गंभीर दुखापत झाली. परिसरात डय़ुटीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ मुलाला केईएम रुग्णालयात नेले होते. मात्र उपचार सुरु करण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. अपघातात गंभीर दुखापत झालेल्या लिओबा हिला सायन रुग्णालयात नेले होते. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अॅन्थनी पहिली इयत्तेत शिकत होता. अपघातप्रकरणी बसचालक बापू नागबोने याला अटक झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पुर्ला येथे भरधाव बेस्ट बसने अनेक पादचाऱ्यांना चिरडले होते. त्यात 7 जणांचा मृत्यू आणि 42 जखमी झाले होते. त्या घटनेनंतरही बेस्ट चालकांच्या निष्काळजीपणामुळे पादचाऱ्यांचे हकनाक बळी जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.