
ठाण्यात गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामांना पेव फुटले असून महापालिका हद्दीत 227 अनधिकृत बांधकामे आढळली आहेत त्यातील केवळ 154 बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून 74 बांधकामे अद्यापही शिल्लक असल्याची माहिती हायकोर्टात देण्यात आली.
ठाणे पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे ठाण्यात गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामे फोफावली आहेत. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने मुंब्रा येथे भूमाफियांनी सुभद्रा टकले यांच्या मालकीच्या सुमारे साडेपाच एकर जमिनीवर 17 बेकायदा बांधकामे उभारली आहेत या प्रकरणी टकले यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोनी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले त्यात त्यांनी नमूद केले की, सदर भूखंडावरील अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आले असून तेथील नळाच्या बेकायदा जोडण्या, वीज कनेक्शन तोडून टाकण्यात आले आहे. केवळ मुंब्राच नव्हे तर संपूर्ण पालिका हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली जात आहे. हायकोर्टाने याची दखल घेत याबाबत पुढील सुनावणीवेळी आदेश जारी करण्याचे संकेत दिले व याप्रकरणावरील सुनावणी तीन आठवडय़ापर्यंत तहकूब केली.
275 नळांचे कनेक्शन तोडले
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई दरम्यान 4 कोटीहुन अधिकचा खर्च आला असून आतापर्यंत बेकायदा 275 नळाचे कनेक्शन तोडण्यात आले तसेच 89 कूपनलिका व त्याला लावलेले 15 मोटर जप्त करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
डेब्रिजचा बांधकामांसाठी वापर
ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे की, बेकायदा बांधकामातून तयार झालेला मलबा (डेब्रिज) सी एन्ड डी वेस्ट प्लांट कडे पाठवले जाते तिथे या डेब्रिजवर क्रशरद्वारे प्रक्रिया करून माती तयार केली जाते व त्याचा वापर बांधकामासाठी केला जातो.