पुणे जिल्ह्यातील 25 विद्यार्थ्यांना नासा भेटीची पर्वणी

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या 25 विद्यार्थ्यांना नासाला जाण्याची संधी मिळाली आहे. तर, 50 विद्यार्थी हे इस्रो या अंतराळ संशोधन केंद्र भेटीसाठी जाणार आहेत. आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिकशास्त्र केंद्राकडून (आयुका) जिल्हा परिषदेला निकाल पाठवला आहे. त्यामध्ये शिरूर आणि खेड तालुक्यांतील प्रत्येकी चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी तीन टप्प्यांत होणाऱ्या चाचणी परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक लेखी परीक्षा आणि दुसरी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. दुसऱ्या ऑनलाइन परीक्षेमधून १३ टक्के विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ‘आयुका’मध्ये ६ ते ८ ऑगस्टदरम्यान २३५ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून ७५ विद्यार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिरूर आणि खेड तालुक्यांतील प्रत्येकी चार विद्यार्थी, आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, मुळशी तालुक्यातील प्रत्येकी दोन, तर इंदापूर, जुन्नर, मावळ, पुरंदर आणि वेल्हा तालुक्यांतील एका विद्यार्थ्यांची नासाला जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे नियोजनाचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.

हे २५ विद्यार्थी जाणार नासाला…
सिद्धी मंजिरे (मोरडेवाडी, ता. आंबेगाव), रुद्र मोरडे (मोरडेवाडी, ता. आंबेगाव), भास्कर तावरे (सांगवी, ता. बारामती), सोहम टेंभरे (सांगवी, ता. बारामती), अदिती राऊत (धावडी, ता. भोर), अदिती पारथे (निगुडघर, ता. भोर), स्पृहा खेडेकर (शेलारमेमानवाडी, ता. दौंड), आयुष शेलार (गलांडवाडी, ता. दौंड), शंतनू कदम (लोणीकंद, हवेली), श्रावणी मगर (लोणीकंद, हवेली), मोहम्मद उमर शेख (शहा, ता. इंदापूर), साईराज पवार (आळेफाटा, ता. जुन्नर), वेदिका गुजर (भोसे, ता. खेड), सिद्धांत शेकडे (धानोरे, ता. खेड), हर्षवर्धन कोहिनकर (दोंदे, ता. खेड), संभवा राक्षे (थिगळस्थळ, ता. खेड), रुद्र राजगुरू (कान्हे, ता. खेड), दर्शन अडसोड (हिंजवडी, ता. मुळशी), आदित्य आहेर (माण, ता. मुळशी), शिवम बडदे (कोडीत, ता. पुरंदर), कस्तुरी मुसमाडे (कोरेगाव भीमा, ता. शिरूर), स्वरूप भागवत (वाबळेवाडी, ता. शिरूर), स्वरूप ब्रहाते (पिंपरखेड, ता. शिरूर), शिवम जाधव (कोयाळी, ता. शिरूर), शुभ्रा रेणुसे (पाबे, ता. वेल्हा)