
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवायीयांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सोमवारी धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे १४०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता रजनीश बरिया यांनी दिली. विसर्ग सुरू झाल्यामुळे प्रशासनही ‘अलर्ट’ झाले आहे.
यंदा उन्हाळा कडक होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २४ टक्क्यांवर आला होता. मात्र, पावसाने मे महिन्याच्या २० तारखेनंतर पिंपरी- चिंचवडसह मावळात दमदार सुरुवात केली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांनंतर यंदा २४ जूनलाच धरणातील पाणीसाठा ५० टक्के झाला होता. ऑगस्टमध्ये धरण परिसरात कोसळणाऱ्या पवना धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुणे जिल्हा तथा घाटमाथा परिसरात हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढत आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता १४०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार आहे. श्रावणसरींमुळे धरणातील पाणीसाठा ९५ टक्यांवर गेला. मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर गेला आहे.
१९२१ मि.मी. पावसाची नोंद
पवना धरण दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी १०० टक्के भरत असते. यंदा मात्र जुलै महिन्यात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जून महिन्यापासून धरण परिसरात १९२१ मि.ली. मीटर पावसाची नोंद झाली आहे.
– रजनीश बरिया, शाखा अभियंता, पवना धरण
शहरात दिवसभर पाऊस
सोमवारी दिवसभर झालेल्या संततधारेमुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. साचलेल्या पाण्यातून वाहनचालक, नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागली. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, मोशी, निगडी, आकुर्डी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे या सर्वच भागांत पाऊस झाला. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. पुणे-मुंबई महामार्गावर एका बाजूने महामेट्रो आणि दुसऱ्या बाजूने अर्बन स्ट्रीट, जलवाहिनीचे काम सुरू आहे. या कामामुळे ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर मोठे खड्डेही पडले आहेत. निगडीतील टिळक चौक ते बजाज ऑटोपर्यंतच्या मार्गावर पाणी साचले होते. यातून वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागली. यामुळे वाहतूक संथ होऊन कोंडी झाली होती. शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोठेही घरात पाणी शिरले नाही. सखल भागांत साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा केल्याचे महापालिकेचे आपत्तिव्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले.