Mumbai Rain Upadate – मध्य रेल्वेची CSMT ते ठाणे आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते CSMT लोकल सेवा पूर्णपणे बंद, रेल्वे ट्रॅकवर साचले पाणी

मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज, शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळ पासून पावसाचे धुमशान सुरू असल्याने मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवाही पूर्णपणे कोलमडून गेली आहे. मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अशाच आता नवीन अपडेट आली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावणारी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मुंबई परिसरात मुसळधार पाऊस आणि रुळावर पाणी साचल्यामुळे, सीएसएमटी आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत, खोपोली आणि कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने ट्विट करून दिली आहे.

कुर्ला ते CSMT लोकल बंद

मुंबईत मुसळधार पाऊस आणि चुन्नाभट्टी स्टेशनवर पाणी साचल्यामुळे, कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानच्या हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मध्य रेल्वेने दिली आहे.

…तरच घराबाहेर पडा!

आज मुसळधार पावसाचा इशारा असल्याने आपण सर्वजण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत आहात अशी आशा आहे. केवळ अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळा आणि लक्षात ठेवा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आम्ही आहोत. खाजगी कंपन्यांना विनंती आहे की शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे ट्विट मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी केले आहे.