इंडिया आघाडीचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरला; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर एकमत, खरगेंची घोषणा

इंडिया आघाडीचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. यासंदर्भात खरगे यांनी एक ट्विटही केले आहे.

सर्व विरोधी पक्षांनी मिळून देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी बी. सुदर्शन रेड्डी यांना आपला संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ही उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक एक ‘वैचारिक लढाई’ असल्याचे खरगे यांनी एक्स वर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले. यावेळी खरगे यांनी रेड्डी यांच्या कार्याचे कौतुक केले.

बी. सुदर्शन रेड्डी हे हिंदुस्थानातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि पुरोगामी कायदेतज्ज्ञ आहेत. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची एक मोठी आणि उज्ज्वल कायदेशीर कारकीर्द राहिली आहे, असे खरगे म्हणाले.

रेड्डी हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे सातत्यपूर्ण आणि धाडसी पुरस्कर्ते राहिले आहेत. ज्या मूल्यांवर आपल्या देशाची स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली आणि ज्यावर आपले संविधान व लोकशाही आधारलेली आहे, ती सर्व मूल्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसतात. आज ही सर्व मूल्ये धोक्यात आली असून, त्यावर हल्ला होत आहे. म्हणूनच, ही निवडणूक लढण्याचा आमचा सामूहिक आणि दृढनिश्चय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पद रिक्त झाले आहे. उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार असून एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन असा सामना रंगताना दिसेल.