
आशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत 9 सप्टेंबर पासून आशिया उपखंडात होणाऱ्या या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली.
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ आशिया चषक स्पर्धेत उतरणार आहे. उपकर्णधारपदाची धुरा शुभमन गिल याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह हे फलंदाज संघात आहे.
जितेश शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघे यष्टिरक्षक संघात निवडण्यात आले असून वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंग, हर्षित राणा यांच्याकडे असणार आहे. हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव फिरकीचे आक्रमण सांभाळतील.
राहुल, अय्यर, ऋतुराज यांना धक्का
केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात स्थान मिळालेले नाही. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतरही यापैकी एकाचीही निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या साई सुदर्शन याच्याकडे ही निवड समितीने दुर्लक्ष केले आहे. इंग्लंड दौऱ्यात धावांसाठी तो झगडत होता, याचा फटका त्याला नक्कीच बसला आहे.
आशिया चषकासाठी संघ –
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंह.
रिझर्व्ह खेळाडू – यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा आणि रियान पराग
🚨 #TeamIndia‘s squad for the #AsiaCup 2025 🔽
Surya Kumar Yadav (C), Shubman Gill (VC), Abhishek Sharma, Tilak Varma, Hardik Pandya, Shivam Dube, Axar Patel, Jitesh Sharma (WK), Jasprit Bumrah, Arshdeep Singh, Varun Chakaravarthy, Kuldeep Yadav, Sanju Samson (WK), Harshit Rana,…
— BCCI (@BCCI) August 19, 2025