
तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. नदीनाल्यांना पूर आले, अनेक धरणांचे दरवाजे उघडले व महापुराच्या पाण्यात गावागावांतील शेती व पिकांना जलसमाधी मिळाली. 12 जण मृत्युमुखी पडले. शेकडो जनावरे पुरात वाहून गेली. महाराष्ट्रातील शेतीबरोबरच मिंध्यांच्या रस्ते दुरुस्ती घोटाळ्यांमुळे राजधानी मुंबईदेखील पुन्हा एकदा बुडाली. तीन दिवसांच्या पावसात ‘सरकार गेले वाहून’ अशी स्थिती राज्यावर ओढवली आहे. हे सरकार हीच महाराष्ट्रावर आलेली एक ‘आपत्ती’ आहे. पावसाच्या नैसर्गिक आपत्तीशी ते काय लढणार?
मुंबईसह संपूर्ण राज्यात गेले तीन-चार दिवस पावसाचे धुमशान सुरू आहे. बहुतांश सर्वच जिल्ह्यांतील नदीनाल्यांना पूर आला व राज्यभरात एकंदर 12 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत तर संततधार पावसाने सर्व रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. आधीच मुंबईचे तमाम रस्ते खड्डे पडल्याने धोकादायक झाले असतानाच हे खड्डेमय रस्ते जलमय झाल्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. ‘‘मुंबई यंदा तुंबू देणार नाही, संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त करू’’ असे अनेक दावे सरकारमधील ‘फेकनाथां’नी केले होते. मात्र हे सर्व दावे किती पोकळ होते, हे दोन दिवसांच्या पावसाने पुन्हा एकदा सिद्ध केले. मे महिन्यात झालेल्या पहिल्या पावसातही मुंबई अशीच जलमय झाली होती. त्याच जल संकटाची मुंबईत पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजे मेमध्ये पाऊस वेळेआधी आला म्हणून सरकार व पालिका प्रशासनाने हात झटकले. मात्र आता पावसाळ्याच्या तिसऱ्या महिन्यातही सरकार आणि पालिका प्रशासन किती ढिम्म आहे, याचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. एरवी मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना दोन-पाच सेंटिमीटर पाणी कुठे साचले तरी ‘‘मुंबई बुडाली होती’’ अशी आवई उठवणारे भारतीय जनता पक्षाचे वाचाळवीर पोपट आता कुठल्या बिळात लपले आहेत की मुंबईच्या रस्त्यांवर साचलेले पाणी नाकातोंडात जाऊन त्यांची वाचा बसली आहे? हवामान खात्याचा इशारा आला की, सरकार ‘रेड अलर्ट’चे पत्रक काढून मोकळे होते. ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला आणि जनतेला सावध राहायला सांगितले म्हणजे
सरकारची जबाबदारी
संपते काय? पाऊस सुरू झाला की, लोक आपापल्यापरीने सावधगिरी बाळगतातच, पण यंदाच्या पावसाळ्यात मुंबई दुसऱ्यांदा बुडाली त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री फडणवीस महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात येऊन लोकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा देऊन मोकळे झाले. जनतेला सावधानतेचा इशारा देणाऱ्या सरकारने मुंबई जलमय होणार नाही यासाठी कोणती सावधानता बाळगली? रस्ते बंद होणार नाहीत, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा ठप्प होणार नाही यासाठी कोणती उपाययोजना केली? एकापाठोपाठ एक सर्व रस्ते जलमय होत असताना सरकार व महापालिकेचा आपत्कालीन कक्ष काय करीत होता? मेमध्ये पहिल्या पावसात मुंबई बुडाली तेव्हा त्याचे खापर कंत्राटदारावर फोडून सरकारने जबाबदारी ढकलली होती. मग आता पुन्हा बुडालेल्या मुंबईचे खापर फोडण्यासाठी सरकारने कोणाचे डोके शोधले आहे? मुंबई शहराला तीन-तीन पालकमंत्री आहेत व मुंबई जलमय होत असताना हे तिन्ही पालकमंत्री काय करीत होते? यातील एक सहपालकमंत्री कबुतराच्या वादात भलतेच सक्रिय झाले होते. मात्र पावसामुळे मुंबईकरांची दैना उडत असताना ते निष्क्रिय दिसले. आपले व आपल्या मिंधे मंडळातील सहकारी मंत्र्यांचे घोटाळे लपवण्यासाठी ऊठसूट दिल्लीला पळणारे मुंबई शहराचे पालकमंत्री गेल्या दोन दिवसांत मुंबईकरांच्या मदतीला धावून आल्याचे कुठे दिसले नाही. आता मात्र त्यांचे फोटोसेशन व चमकोगिरी सुरू आहे. मुंबईबरोबरच ठाणे, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही
अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी
झाली. मराठवाड्यात काही ठिकाणी ढगफुटीचे प्रकार घडले. एकट्या नांदेड जिल्ह्यात पुरामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. मुखेड तालुक्यात झालेल्या भयंकर ढगफुटीमुळे लेंडी नदीला महापूर आला, आसपासच्या अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. अचानक आलेल्या पुरात माणसांप्रमाणेच घराबाहेर दावणीला बांधलेली जनावरेही वाहून गेली. मराठवाडा-विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जबर फटका बसला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे राज्यभरातील लाखो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. एकट्या मराठवाड्यातील शेतात पाणी शिरल्याने 2.80 लाख हेक्टरवरील उभ्या पिकांचे खत झाले आहे. दोन दिवसांत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू होतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र मागच्याच नुकसानीचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारी पंचनाम्याने शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे? तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. नदीनाल्यांना पूर आले, अनेक धरणांचे दरवाजे उघडले व महापुराच्या पाण्यात गावागावांतील शेती व पिकांना जलसमाधी मिळाली. 12 जण मृत्युमुखी पडले. शेकडो जनावरे पुरात वाहून गेली. महाराष्ट्रातील शेतीबरोबरच मिंध्यांच्या रस्ते दुरुस्ती घोटाळ्यामुळे राजधानी मुंबईदेखील पुन्हा एकदा बुडाली. तीन दिवसांच्या पावसात ‘सरकार गेले वाहून’ अशी स्थिती राज्यावर ओढवली आहे. हे सरकार हीच महाराष्ट्रावर आलेली एक ‘आपत्ती’ आहे. पावसाच्या नैसर्गिक आपत्तीशी ते काय लढणार?