ठसा- अच्युत पोतदार

>> दिलीप ठाकूर

एखाद्या लोकप्रिय चित्रपटातील एखादी लक्षवेधक व्यक्तिरेखा व त्या भूमिकेतील एखादा संवाद असा काही लोकप्रिय होतो की, तीच त्या कलाकाराची एक ओळख निर्माण करते. चतुरस्र अभिनेते अच्युत पोतदार यांच्या बाबतही तेच घडले. चित्रपट, रंगभूमी, छोटय़ा पडद्यावरील मालिका व जाहिरातपट अशा विविध माध्यमांतून अनेक वर्षे सातत्याने भूमिका साकारत असलेल्या अच्युत पोतदार यांचा राजपुमार हिरानी दिग्दर्शित ‘थ्री इडियट्स’मधील ( 2009) ‘‘अरे भाई… कहना क्या चाहते हो?’’ हा संवाद प्रचंड लोकप्रिय झालाच, पण एकीकडे ती त्यांची ओळख झाली. या चित्रपटाला सोळा वर्षे होऊनदेखील या संवादाची लोकप्रियता कायम आहे याचे श्रेय तो विशिष्ट शैलीत मांडलेल्या अच्युत पोतदार यांनाही आहे. साधा वाटणारा संवाद बरेच काही विचारणारा ठरला.

दुसरीकडे त्या संवादावरून मिम्स, एआय रील्स, विनोद असेही बरेच काही निर्माण झाले. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भाष्यावर सोशल मीडियातून तिरकस प्रतिक्रिया देताना ‘‘अरे भाई… कहना क्या चाहते हो?’’ असे गमतीत म्हटले जाऊ लागले. अच्युत पोतदार यांचे 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक मराठी व सवाशे हिंदी चित्रपट, सव्वीस नाटके, पंचवीस मालिका व पंचेचाळीस जाहिरातपटांत काम केले. घराघरांत पोहोचलेले कलाकार हे त्यांचे वैशिष्टय़. अच्युत पोतदार यांची एकूणच वाटचाल विशेष लक्षवेधक. त्यांचा जन्म (22 ऑगस्ट 1934) मध्य प्रदेशातील जबलपूर येथील. त्यांचे बालपण इंदूरचे, तर कुमार गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी यांची चरित्रे लिहिणारे वसंत पोतदार यांचे ते थोरले बंधू. इंदूर येथे नाटय़ शतक महोत्सव झाला तेव्हा त्यातून स्फूर्ती घेत लहान मुलांची संस्था स्थापन करून घरोघरी आणि गणपती उत्सवात दहा दिवस ते नाटके सादर करायचे. त्यांच्या या चमूत अरुण दातेही नाटकात असायचे. अभ्यासाचीही त्यांना आवड. बीएससी उत्तीर्ण झाल्यावर शिक्षकाची नोकरी करताना सकाळी आठ ते साडेदहा कॉलेज करून ते नोकरी सांभाळत अर्थशास्त्रात एमएमध्ये विद्यापीठात प्रथम आले. उत्तम शिक्षणाने व्यक्तिमत्त्व विकास होतो यावर त्यांचा विश्वास. तो त्यांनी कायम ठेवला. काही काळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी करत असतानाच ते भारतीय लष्करात सामील झाले. तोही अनुभव त्यांनी आवडीने घेतला. त्यानंतर त्यांनी इंडियन ऑईलमध्ये उच्च पदावर नोकरी केली. तेथून निवृत्त झाल्यावर मुंबईत आले आणि येथील मनोरंजन क्षेत्रात स्थिरावले.

मुंबईत त्यांचा संबंध नाटककार सत्यदेव दुबे यांच्याशी आला. सुमारे पंच्याहत्तर प्रायोगिक नाटकांतून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. रंगभूमीवर कार्यरत असतानाच दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्यामुळे ते चित्रपट क्षेत्रात आले. त्यांच्या ‘अर्धसत्य’ ( 1983) या चित्रपटात त्यांनी पोलीस इन्स्पेक्टर पाटील ही भूमिका साकारत चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक व समीक्षक यांचे लक्ष वेधून घेतले. भूमिका छोटीच होती, पण त्यातही ते लक्षात आले. रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव त्यांना त्यात व त्यानंतरही उपयुक्त ठरला.

दिग्दर्शिका विजया मेहता यांनी त्यांना ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकात लक्षवेधक भूमिका दिली. सुलभा देशपांडे यांच्या सोबतही त्यांनी काम केले. त्यांनी भूमिका साकारलेल्या चित्रपटांत ‘अंगार’, ‘राजू बन गया जंटलमन’, ‘तेजाब’, ‘चमत्कार’, ‘नरसिंहा’, ‘प्रहार’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘रंग दे बसंती’, ‘भूतनाथ’, ‘ग्रहण’, ‘इश्क’ (या चित्रपटात काजोलचे वडील) अशा अनेक चित्रपटांचा समावेश होतो.

ते कायमचे लक्षात राहिले ते ‘थ्री इडियट्स’मधील टीचरच्या भूमिकेमुळे. त्यांनी ‘वागले की दुनिया’, ‘नुक्कड’, ‘भारत एक खोज’, ‘श्रीमती तेंडुलकर’, ‘प्रधानमंत्री’, ‘माझा होशील का?’ अशा अनेक विविध प्रकारच्या मालिकांत काम केले. विशेष उल्लेखनीय गोष्ट. मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असताना अनेक वर्षे ते लोकल ट्रेन, बेस्ट बस, रिक्षा यातून प्रवास करण्यास प्राधान्य देत. एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण वावरावे याकडे त्यांचा कल होता.

कित्येक रील्समधूनही ते दिसत. सतत नवीन मार्गावरून वाटचाल करत करत आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेल्या अच्युत पोतदार यांनी कायमच व्यावसायिक शिस्त, सौजन्यशील वागणे, अभिनयातील साधेपणा व वागण्यात नम्रता यांना प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांना सतत मागणी होती. झी मराठीच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.