
नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या उत्तराखंडमधील धराली गावातील परिस्थिती बिकट आहे. धरालीतील 12 ठिकाणी मृतदेह अडकले आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस आणि दलदल, मोठी यंत्रसामग्री पोचण्यास अडथळे यामुळे बचाव पथकाचे कर्मचारी दोन तास फक्त हाताने खोदकाम करत आहेत. मागील 14 दिवसांपासून हीच परिस्थिती आहे.
दररोज सकाळी 6ः30 वाजता आम्ही स्वतःला चार संघांत विभागतो. प्रत्येक संघात 40 सैनिक असतात. त्यानंतर आम्ही हवामान अपडेट घेतो. त्यानंतर आम्ही सुमारे 80 एकरवर पसरलेल्या ढिगाऱयात जीवनाचा शोध सुरू करतो. आम्ही आपत्तीग्रस्त भागाचे 4 सेक्टरमध्ये विभाजन केले आहे आणि दररोज 8 ते 10 ठिकाणी खोदकाम करतो. आमच्याकडे मोठय़ा यंत्रसामग्री नाहीत म्हणून आम्ही हाताने खोदकाम करतो. आम्ही फक्त एक किंवा दोन तास काम करू शकतो आणि नंतर मुसळधार पाऊस सुरू होतो, अशी माहिती धराली बचाव कार्याचे प्रभारी एसडीआरएफ कमांडंट अर्पण यदुवंशी यांनी दिली.
आम्हाला माहिती आहे की, 12 ते 13 ठिकाणी ढिगाऱयाखाली 20 ते 25 फूट गाडलेले अनेक मृतदेह आहेत, पण आम्ही असहाय्य आहोत. असा ढिगारा काढण्यासाठी जड माती हलवणाऱया यंत्रांची आवश्यकता आहे, परंतु धरालीला जाण्यासाठी रस्त्याअभावी यंत्रे येऊ शकत नाहीत. त्यांना हेलिकाॅप्टरने आणता येते, परंतु हवामान खराब आहे, असे यदुवंशी यांनी सांगितले.
चऱया दुर्घटनेत धरालीव्यतिरिक्त बागोरी, झाला, जसपूर, मुखाबा, पुराली आणि सुखी गावांचा संपर्प तुटला आहे. येथील तीन हजारांहून अधिक लोकसंख्येला दूध आणि रेशन मिळणे कठीण आहे. गॅस पुरवठादेखील बंद आहे. एसडीआरएफ त्यांना एका वेळी हेलिकाॅप्टर जितके वाहून नेऊ शकेल तितकीच मदत करू शकते.
निदान मृतदेह तरी सापडले पाहिजेत
5 ऑगस्ट रोजी धराली येथे आपत्ती आली. 65 लोक बेपत्ता झाले. त्या वेळी 38 वर्षीय मुकेश पंवार, त्यांची पत्नी विजेता आणि मुलगा बेपत्ता आहेत. मुकेश पंवार यांचा भाऊ खुशपाल बचावला आहे. भाऊ, वहिनी आणि पुतण्याचा मृतदेह तरी सापडावा, जेणेकरून अंत्यसंस्कार करता येतील, या एका आशेवर खुशपाल पंवार धरालीत थांबले आहेत.
रविवारी खराब हवामानामुळे हेलिकाॅप्टर एकदाही उड्डाण करू शकले नाही. उर्वरित दिवशीही फक्त एक किंवा दोन फेऱ्या करता आल्या. आम्ही तिथे इंटरनेट आणि वीज पूर्ववत केली आहे, पर्यायी रस्ता बांधण्यात आला होता, पण तो पुन्हा तुटला, अशी माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्याने दिली.