दुःखद आणि अन्यायकारक, श्रेयस-यशस्वीला वगळल्यानंतर माजी फिरकीवीर अश्विनचा संताप

श्रेयस अय्यरची निवड अपेक्षित होती. यशस्वी जैसवाललाही 15 खेळाडूंमध्ये निवडायला हवे होते, पण दोघांनाही आशिया कप संघातून वगळण्यात आले. बीसीसीआयच्या निवड समितीच्या या संघ निवडीबाबत ‘दुःखद आणि अन्यायकारक’ अशा भावना व्यक्त करत माजी फिरकीवीर रविचंद्रन अश्विनने आपला संताप व्यक्त केला.

अश्विनने सोमवारीच अय्यरच्या निवडीबाबत आपला अंदाज व्यक्त करताना त्याच्या निवडीसाठी शिवम दुबेला संघाबाहेर जावे लागणार असल्याचे सांगितले होते, मात्र तसे घडलेच नाही. त्यामुळे संघ जाहीर झाल्यानंतर अश्विनने आपल्या ‘यूटय़ूब’ चॅनलवर आपले मन मोकळे केले. तो म्हणाला, ‘निवड हा नेहमीच एक थँकलेस जॉब असतो. कुणाला तरी बाहेर बसवावेच लागते, पण त्या खेळाडूच्या चेहऱयावरची निराशा आणि दुःख बघणे कठीण असते. आजच्या निवडीनंतर जैसवाल-अय्यरला कुणीतरी संपर्क साधला असेल आणि त्यांना बळ दिले असेल.’

अश्विन पुढे म्हणाला, श्रेयसच्या आयपीएल कामगिरीची विशेष दखल घ्यायला हवी होती. श्रेयसने काय चुकीचे केले? केकेआरला विजेता बनवल्यानंतरही त्याला लिलावात टाकण्यात आले. असे कधी घडले नव्हते. मग पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना त्याने 2014 नंतर संघाला पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचवले. तरीसुद्धा त्याला संघाबाहेर ठेवणे अत्यंत अन्यायकारक आहे. त्याने शेवटचा टी-20 सामना हिंदुस्थानसाठी डिसेंबर 2023 मध्ये खेळला होता. आयसीसी वर्ल्ड कपनंतर त्याला बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आले. पुढे त्याला सर्व फॉरमॅटमधून संघाबाहेर ठेवण्यात आले, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वन डे संघातून पुनरागमन करताना त्याने आपल्या बॅटचा जलवा दाखवला.

दरम्यान, इंग्लंड गाजवणारा शुभमन गिल आशिया कपसाठी उपकर्णधार म्हणून संघात आला. त्याबद्दल अश्विन म्हणाला, ‘शुभमन सुपर फॉर्मात आहे, पण श्रेयसही उच्च दर्जाच्या फॉर्मात आहे. जैसवालची ओव्हलमधली खेळीही अफलातून होती. तरी त्याला वगळून गिलला जागा देणे हा त्याच्यावरचा अन्यायच आहे. मला गिलसाठी आनंद आहे, पण श्रेयस-जैसवालसाठी खूप वाईट वाटतेय, असे अश्विन म्हणाला.