शेकापचे पुरुषोत्तम धोंडगे शिवसेनेत, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे पुरुषोत्तम धोंडगे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

पुरुषोत्तम धोंडगे हे शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते, माजी खासदार आणि आमदार केशवराव धोंडगे यांचे पुत्र आहेत. केशवराव धोंडगे हे नांदेड जिह्यातून पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. धोंडगे 1957 मध्ये पहिल्यांदा द्वैभाषिक महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 1962, 1972, 1985 आणि 1990 मध्ये ते विधानसभेचे आमदार बनले होते.

मुसळधार पावसातही पुरुषोत्तम धोंडगे आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते ‘मातोश्री’वर आले होते. त्यांचे काैतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यभर पावसाने धुमापूळ घातला असतानाही तुम्ही सर्वजण इथे आलात, त्यातून तुमची जिद्द दिसते. मी सोशल मीडियावर बघितले, मुंबईत भगवे वादळ येत आहे, पण हे जे नैसर्गिक वादळ आलेय त्याचे काय? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पूरस्थितीला सरकारच जबाबदार असल्याची टीका केली. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार रोहिदास चव्हाण आदी उपस्थित होते.