
बनावट कर्ज फसवणूक प्रकरणात प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन भागीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी बर्दापूरकर यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुलुंड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
प्लॅनेट मराठीच्या माजी भागीदार सौम्या विलेकर यांना ऑक्टोबर 2023 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत स्वाक्षरी आणि छायाचित्रासह बनावट करार सापडला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे, अक्षय बर्दापूरकर व अन्य आरोपींनी विविध बँकांकडून कोटय़वधी रुपयांचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान याप्रकरणी सौम्या विलेकर यांनी बर्दापूरकर व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
त्या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सौम्या विलेकर यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत खंडपीठाने प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांच्यासह या प्रकरणात सहभागी असलेले मनाली दीक्षित, दोधा अहिरे आणि धवल शाह यांच्याविरोधात फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवा, असे निर्देश मुलुंड पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी कलम 420, 465, 467, 468, 471 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
- ‘प्लॅनेट मराठी’च्या माजी भागीदार सौम्या विलेकर यांच्या नावे ऑक्टोबर 2023 रोजी एका बनावट ‘रिकाॅन्स्टिटय़ुशन ऑफ पार्टनरशिप डीड’ तयार करण्यात आला. या बनावट करारावर सौम्या यांचा फोटो आणि खोटय़ा स्वाक्षऱ्या वापरण्यात आल्या.
- या बनावट कागदपत्रांच्या आधारे, आरोपींनी अॅक्सिस बँक, डय़ूश बँक आदी बँकांकडून कोटय़वधी रुपयांचे कर्ज घेतले. याच कागदपत्रांचा वापर बौद्धिक संपत्तीशी संबंधित मोठे व्यवहार करण्यासाठीही करण्यात आला.
- सौम्या विलेकर यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व व्यवहार त्यांच्या परवानगीशिवाय आणि माहितीशिवाय झाले. त्यांनी स्पष्ट केले की, कंपनीशी संबंध तोडण्यासाठी जानेवारी 2024 रोजी ‘डीड ऑफ अॅडमिशन-कम-रिटायरमेंट’ हा एकमेव कायदेशीर दस्तऐवज त्यांनी तयार केला होता.