सरकारने पाडला आश्वासानांचा पाऊस; 42 हजार कोटींची गुंतवणूक, 26 हजार नोकऱ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दहा सामंजस्य करार

महाराष्ट्रात आज विविध गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार आणि दोन रणनीतिक करार करण्यात आले. त्यातून राज्यात तब्बल 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 28 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मंत्रालयातील समिती कक्षात 10 सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. डेटा सेंटर, पोलाद, औद्योगिक उपकरणे, हरित उर्जा, लॉजिस्टिक सेंटर, रिअल इस्टेट या क्षेत्रांसाठी हे करार झाले. याशिवाय, ग्लोबल इंडिया बिझिनेस काॅरिडॉरतर्फे महाराष्ट्रातील युके व युरोपमधील गुंतवणूक आकर्षिक करण्यासाठी सहकार्य करण्याचा सामंजस्य करार आणि टीयूटीआर हायपरलूम प्रा.लि. कंपनीकडून जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे.

  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेले 8 सामंजस्य करार आणि 2 रणनीतिक करार.
  • सोलर पॅनेल निर्मितीसाठी ज्युपिटर इंटरनॅशनल लि. या कंपनीसोबत 10900 कोटी रूपयांची गुंतवणूक करार झाला असून यातून 8308 रोजगार निर्मिती होणार आहे.
  • रोचक सिस्टिम्स प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटर करिता 2508 कोटी रूपयांचा करार. 1 हजार रोजगार निर्मिती.

मुख्यमंत्री म्हणाले की, गुंतवणूकदारांनी अतिशय ठाम आणि सकारात्मक बांधिलकी दाखवली आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक सुरळीत होण्यासाठी शासनाची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यासोबत काम करेल. याशिवाय हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळत आता आयआयटी मुंबई व आयआयटी मद्रास यांच्यामुळे प्रकल्पाला गती मिळत आहे. लॉजिस्टिक, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.