
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असून त्यांच्या रूपाने इंडिया आघाडीने ‘सुदर्शन चक्र’ सोडल्याची चर्चा आहे. रेड्डी यांचा सामना एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी होईल.
उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. सत्ताधारी एनडीएने याआधीच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. इंडिया आघाडीमध्येही उमेदवाराच्या नावावर चर्चा सुरू होती.
उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार विश्वासार्ह, निष्कलंक व बिगर राजकीय असावा, असा आघाडीतील बहुतेक पक्षांचा आग्रह होता. सर्वांची मते विचारात घेऊन एकमताने रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली.
एनडीएच्या चालीला शह
एनडीएने उपराष्ट्रपतीपदासाठी सी पी राधाकृष्णन यांचे नाव जाहीर करून दाक्षिणात्य पक्षांची गोची करण्याचा प्रयत्न केला होता. दक्षिणेतील राजकीय पक्षांना राधाकृष्णन यांच्या नावाला विरोध करणे कठीण जाईल, असा एनडीएचा होरा होता. मात्र, रेड्डी यांचे नाव जाहीर करून इंडिया आघाडीने त्या चालीला शह दिला आहे. रेड्डी यांच्या नावामुळे आता तेलुगू देसम पार्टी, वायएसआर काँग्रेस, बीआरएस या पक्षांना रणनीतीत बदल करावा लागणार आहे. आम आदमी पक्षानेही रेड्डी यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला आहे.
कोण आहेत सुदर्शन रेड्डी?
सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. 1971 साली आंध्र प्रदेश बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून त्यांची नोंदणी झाली. त्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. 1988-90 उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून ते कार्यरत होते. केंद्र सरकारचे वकील म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. उस्मानिया विद्यापीठात कायदा सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून साडेचार वर्षे न्यायदान केल्यानंतर 2011 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर तेलंगण सरकारने नेमलेल्या एका तज्ञ समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
ही वैचारिक लढाई – खरगे
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही एक वैचारिक लढाई आहे. सर्व विरोधी पक्षांची हीच भूमिका आहे. त्यामुळेच आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमताने उमेदवार निवडला आहे. अशा वेळी इतर विरोधी पक्षही एकत्र येऊ शकले तर लोकशाहीचे ते मोठे यश असेल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
‘इंडिया आघाडीकडून उमेदवारी मिळाल्याचा खूप खूप आनंद आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्व खासदारांनी मला पाठिंबा द्यावा, ही नम्र विनंती करतो.’ – बी. सुदर्शन रेड्डी