
पतीला बेरोजगार म्हणून हिणवणे पत्नीला भारी पडले आहे. ही मानसिक क्रूरता आहे, असे म्हणत छत्तीसगड हायकोर्टाने पतीच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला.
हे प्रकरण भिलाई येथील आहे. कोरोना काळात वकिलाची नोकरी गेली, पण पत्नीला प्रिन्सिपलची नोकरी मिळाली. त्यानंतर पत्नीने पतीला बेरोजगार म्हणून हिणवायला सुरुवात केली. तसेच ती मुलांना घेऊन बाहेर पडली. घरात फक्त एक पत्र लिहून ठेवले. पतीने तिला खूप समजावले, पण तिने ऐकले नाही. अखेर पतीने न्यायालयात धाव घेतली. छत्तीसगड हायकोर्टाने पतीला दिलासा देत घटस्फोटाला मंजुरी दिली. आधी पतीचा घटस्फोटाचा अर्ज फॅमिली कोर्टाने ऑक्टोबर 2023 साली फेटाळला होता.
भिलाई येथील वकिली पेशा असलेल्या अनिलने हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल याला दोन मुलं आहेत. लग्नानंतर काही वर्षे त्याचे वैवाहिक जीवन चांगले होते. अनिलचे म्हणणे आहे की, पत्नीने पीएचडी केल्यानंतर ती प्रिन्सिपलची नोकरी करू लागली. तेव्हापासून तिचे वागणे बदलले आहे. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून वाद घालत आहे.
– नोकरी गेल्यानंतर तर पत्नीचे वागणे आणखी बिघडले. त्यानंतर अनिलने फॅमिली कोर्टात अर्ज केला. तो अर्ज फेटाळल्यानंतर त्याने हायकोर्टात धाव घतेली. पतीचे साक्षीदार, तसेच पत्रव्यवहार याचा विचार करून फॅमिली कोर्टाचा निर्णय फेटाळत हायकोर्टाने घटस्फोट मंजूर केला. पत्नीने कोणतंही वैध कारण नसताना पतीला सोडले आहे आणि बेरोजगार म्हण्नू हिणवले ही मानसिक क्रूरता आहे, असे निरीक्षण हायकोर्टाने मांडले.