
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशा-देशातील युद्धे थांबवून शांततेचे नोबेल पटकावण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचे मित्रराष्ट्र इस्रायल मोठय़ा युद्धाची तयारी करत आहे. हमास युद्धबंदीच्या प्रस्तावाला दाद देत नसल्यामुळे संतापलेल्या इस्रायलने गाझामध्ये 60 हजार सैनिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा रक्तरंजित संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
हमासचे समूळ उच्चाटन करण्याची रणनीती इस्रायलने आखली आहे. त्यासाठी 60 हजार अतिरिक्त सैनिकांची फौज मैदानात उतरवण्यात येणार आहे.
ट्रम्प यांच्या दुटप्पीपणावर टीका
इस्रायलला अमेरिकेचा भक्कम पाठिंबा आहे हे लपून राहिलेले नाही. डोनाल्ड ट्रम्प हे जगभरात वेगवेगळ्या देशांतील वाद मिटवत आहेत. सध्या ते रशिया-युव्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, इस्रायल नव्या युद्धाची तयारी करत असताना त्यावर चकार शब्द काढत नाही. ट्रम्प यांच्या या दुटप्पीपणावर जगभरातून टीका होत आहे.