रोहित, विराट वन डे क्रमवारीतून गायब, आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये खळबळ

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वन डे क्रमवारीतून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे स्टार खेळाडू अचानक गायब झाले आहेत. याआधी जाहीर झालेल्या वन डे क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱया, तर विराट कोहली चौथ्या स्थानावर होते, मात्र 20 ऑगस्टला जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत हे दोघेही दिग्गज फलंदाज टॉप-100 मधूनच हद्दपार झाले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

रोहित शर्मा व विराट कोहली या दोघांनी 9 मार्च 2025 ला न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये शेवटचा वन डे सामना खेळला होता. टीम इंडियाने न्यूझीलंडला 4 गडी राखून हरवत विजेतेपदावर मोहोर उमटवली होती. विराट आणि रोहित अजूनही आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सक्रिय असून निवृत्तीची घोषणा त्यांनी केलेली नाही. त्यामुळे त्यांची नावे अचानक क्रमवारीतून गायब होणे, हा मोठा धक्का आहे, मात्र आयसीसीच्या नियमांनुसार जर एखाद्या खेळाडूने ठरावीक कालावधीत (टेस्टसाठी 12 ते 15 महिने आणि वन डे व टी-20 साठी 9 ते 12 महिने) एकही सामना खेळला नसेल तर त्याला टॉप-100 क्रमवारीतून वगळले जाऊ शकते.

याशिवाय, एखादा खेळाडू एखाद्या फॉरमॅटमधून किंवा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरीही त्याला कायमस्वरूपी आयसीसी क्रमवारीतून हटवले जाते. उदाहरणार्थ, महेंद्रसिंग धोनीने 2014 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा त्याला कसोटी क्रमवारीतून काढून टाकण्यात आलं, पण तो वन डे क्रमवारीत कायम राहिला होता. याच कारणामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्याच्या टेस्ट व टी-20 क्रमवारीमध्ये दिसत नाहीत. 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी टी-20 फॉरमॅटला रामराम ठोकला आणि या वर्षी मे महिन्यात टेस्ट क्रिकेटलाही निरोप दिला.

विराट-रोहित कधी खेळणार?

आता विराट कोहली आणि रोहित शर्मा हिंदुस्थानसाठी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर वन डे मालिकेत खेळताना दिसतील. 19 ऑक्टोबरपासून पर्थ येथे या मालिकेची सुरुवात होईल. मात्र, वृत्तानुसार निवड समिती 2027 च्या वन डे वर्ल्ड कपच्या योजनेत या दोघांना फारसं स्थान देतील की नाही, याबाबत साशंकता आहे.

शुभमन गिल ‘नंबर वन’

आयसीसीच्या ताज्या वन डे क्रमवारीनुसार शुभमन गिल 784 गुणांसह फलंदाजी क्रमवारीत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान आहे. त्याच्या खालोखाल पाकिस्तानचा बाबर आझम 739 गुणांसह दुसऱया क्रमांकावर आहे. हिंदुस्थानचा श्रेयस अय्यर 704 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

केशव गोलंदाजीत ‘महाराज’

गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डेत त्याने 5 बळी टिपले होते. त्यामुळे 687 गुणांमुळे दोन स्थानाने प्रगती करत केशव महाराज अव्वल स्थानावर पोहोचला. श्रीलंकेचा महेश तीक्ष्णा दुसऱया, तर हिंदुस्थानचा कुलदीप यादव तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.