भाजप आमदाराचा कारनामा, दिल्लीच्या CM रेखा गुप्तांच्या हल्लेखोरासोबत आप नगरसेवकाचा AI फोटो केला शेअर

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी जनता दरबार सुरू असताना हल्ला झाला. हल्लेखोराने रेखा गुप्ता यांच्या कानशि‍लात लगावली. हा प्रकार उघड होताच भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये कलगितुरा सुरू झाला. मोती नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश खुराना यांनी रेखा गुप्ता यांच्या हल्लेखोराचा आप नगरसेवकासोबतचा फोटो शेअर केला आणि हल्लेखोर ‘आप’शी संबंधित असल्याचा दावा केला. मात्र ‘आप’ने हा दावा खोडून टाकत सदर फोटो ‘एआय’द्वारे बनवण्यात आल्याचे स्पष्ट केले आणि खरा फोटो शेअर करत भाजपचे पितळ उघडे पाडले.

रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणारा गुजरातचा असून त्याचे नाव राजेश खिमजीभाई साकरिया (वय 41) आहे. त्याचा फोटो समोर आल्यानंतर भाजप आमदार हरीश खुराना यांनी एक ट्विट केले. यात त्यांनी आरोपीचा थेट आपशी संबंध जोडला.

‘ज्याचा संशय होता तेच घडले आहे. अरविंद केजरीवाल यांचा खास माणूस गोपाल इटालिया यांच्यासोबतचा फोटो सर्व काही सांगून जातो. याचाच अर्थ आज रेखा गुप्ता यांच्यावर हल्ल्याचा थेट संबंध आपशी असल्याचे स्पष्ट होते. या फोटोचे सत्य केजरीवाल यांनी सांगावे? हे नाते नक्की काय सांगते, हे स्पष्ट करा’, असे ट्विट हरीश खुराना यांनी केले.

हरीश खुराना यांनी शेअर केलेला फोटो एआय असल्याचे आपने स्पष्ट केले. आप नेते गोपाल इटालिया यांनी खुराना यांचे ट्विट रिट्विट करत एक फेसबुक लिंकही शेअर केली. माझ्या या जुन्या व्हिडीओतील काही स्क्रिनशॉट घेऊन ते एडिट करून खोटा फोटो बनवण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असूनही तुम्हाला असे घाणेरडे काम करताना जरा सुद्धा लाज वाटत नाही का? असा सवाल इटालिया यांनी खुराना यांना केला.