पुणे पालिकेच्या 9 हजार कंत्राटी कामगारांना मिळणार बोनस

पुणे महापालिकेच्या 9 हजारांहून अधिक कंत्राटी कामगारांना बोनस देण्यास प्रशासनाने सकारात्मकता दाखविली आहे. कायद्यातील तरतुदींनुसार कंत्राटी कामगारांना बोनस देता येऊ शकतो, अशी भूमिका महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली आहे.

महापालिकेच्या विविध खात्यांत सुमारे 9 हजारांहून अधिक कंत्राटी कामगार अनेक वर्षांपासून काम करत आहेत. या सर्व कामगारांना बोनस अॅक्टप्रमाणे बोनस मिळावा, पगारी रजा मिळाव्यात. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे आणि २ ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या कायद्याप्रमाणे याचा लाभमिळावा, अशा मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या.

राष्ट्रीय मजदूर संघाकडून या सर्व कर्मचाऱ्यांना संघटित करून गेली ६ वर्षे वेळोवेळी विविध प्रकारची आंदोलने महापालिकेसमोर करण्यात आली होती. यासंदर्भात मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासनाकडून महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, कामगार सल्लागार नितीन केंजळे, राज्य शासनाच्या कामगार विभागाचे सहायक कामगार आयुक्त गजानन शिंदे, तर कामगारांकडून राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, संघटक विशाल बागुल, प्रतिनिधी बाबा कांबळे, विजय पांडव, अरविंद आगम, संदीप पाटोळे, उज्ज्वल साने, लक्ष्मण मासाळ आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेत यावर्षीपासून दिवाळीपूर्वी या सर्व कामगारांना पगाराच्या ८.३३ टक्के बोनस देण्याविषयी प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली. राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या, वार्षिक पगारी रजा देणे, सर्व कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार स्लिप देण्याबाबत व सर्व कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार देण्याबाबत योग्य ते आदेश आयुक्तांनी दिले. ईएसआयसी कार्ड ज्या ज्या कामगारांना आवश्यक आहे त्या सर्व कामगारांना देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांच्या पगारातून विनाकारण कपात करण्यात येते अशी कोणतीही बेकायदेशीर कपात करण्यात येऊ नयेत, अशा सूचना या बैठकीत आयुक्तांनी दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.