भटक्या कुत्र्यांनी चार महिन्यांत 9 हजार कल्याण-डोंबिवलीकरांचे लचके तोडले, निर्बिजीकरणाचा वार्षिक एक कोटी खर्च पाण्यात

कल्याण-डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत कल्याण-डोंबिवली शहरात रात्री अपरात्री कामावरून परतणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. भटके श्वान नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. गेल्या चार महिन्यांत ८ हजार ७८९ जणांचे कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर वर्षाला एक कोटी १८ लाख खर्च केले जातात. मात्र त्याचा योग्य विनियोग होत नसल्याने करदात्यांचे पैसे पाण्यात जात असून भटक्या श्वानांची दहशत मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे.

शहरातील कचराकुंड्या, उकिरडे, रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक वावर असतो. नागरिक आपला जीव मुठीत घेऊन घर गाठतात. भटकी कुत्री लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातवरण आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत तब्बल ८ हजार ७८९ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एजन्सी नेमके काय काम करते?

भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना अँटी रेबीज व्हॅक्सीन देण्यासाठी केडीएमसीने एजन्सी नेमली आहे. याबाबत पालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत ४ हजार ५५२ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना अँटी रेबीज व्हॅक्सीन देण्यात आले आहे. दर महिन्याला १००० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी महापालिकेला प्रति कुत्र्यासाठी ९८९ रुपये खर्च येतो. मात्र तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने नागरिकांमध्ये भीती आहे.