भिवंडी प्रभाग रचनेवर राजकीय दबाव कुणाचा? जिल्हा परिषद गटांची रचना सत्ताधाऱ्यांच्या सोयीची

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना बनवण्यात येत असून ठाणे जिल्हा परिषदेंतर्गत भिवंडी तालुक्यातील प्रभाग रचना बनवताना निवडणूक आयोगाने आदर्श प्रभाग रचनेच्या सूचनांना सपशेल हरताळ फासल्याचे समोर आले आहे. ही प्रभाग रचना बदलण्यासाठी कुणाचा राजकीय दबाव अधिकाऱ्यांवर आहे, असा सवाल विचारला जात आहे.

रांजणोली गटात लोकसंख्या का फुगवली? अंजूर गटाची लोकसंख्या कुणाच्या फायद्यासाठी?

रांजणोली गटाची निर्मिती करताना त्यात २५ हजार ५७५ इतकी लोकसंख्या कोंबण्यात आली. तर रांजणोली गणाची लोकसंख्या १२ हजार २४० व गोवे गणाची लोकसंख्या १३ हजार ३३५ अशी करण्यात आली. त्यामुळे शासन निर्णयाला हरताळ फासून रांजणोली गटाची लोकसंख्या जाणीवपूर्वक आणि राजकीय दबावाखाली वाढवण्यात आली. तर त्याजवळच्या अंजूर जिल्हा परिषद गटाची लोकसंख्या मात्र दहा टक्क्यांपेक्षाही कमी ठेवली आहे. ती का? आणि कुणाच्या भल्यासाठी, असा संतप्त सवाल तक्रारदार अॅड. सुजित भोईर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख शरद पाटील यांनी केला आहे. २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत पिंपळघर गावचा समावेश अंजूर गटात होता. तो या प्रभाग रचनेत जाणीवपूर्व रांजणोली गटात करण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे लोकसंख्या वाढ करताना भौगोलिक रचना विचारात घेणे गरजेचे असतानाही सलगता नसलेल्या गावांची लोकसंख्या रांजणोली गटात जोडण्यात आली आहे, अशी तक्रार जिल्हाधिकारी व कोकण आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेला भाजप मंडळ अध्यक्ष नीलेश गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष काध्यक्ष गणेश गुळवी, भाजपचे बाळकृष्ण ठाकरे, शिवसेनेचे विभागप्रमुख शरद पाटील यांनी हरकती घेतल्या आहेत.

भिवंडी ग्रामीण जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकसंख्या ४ लाख ७१ हजार ७२१ इतकी आहे. त्यानुसार २१ जिल्हा परिषद व ४२ पंचायत समिती गणांची निर्मिती करण्यासाठी जिल्हा परिषदेसाठी २० हजार ५५८ तर पंचायत समितीसाठी १० हजार २७९ ही लोकसंख्या प्रमाण मानण्यात आली आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी शासन निर्णयानुसार प्रभाग रचना निश्चित करायची होती. त्यामध्ये भौगोलिक कारणास्तव दहा टक्के कमाल किंवा दहा टक्के किमान वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

रांजणोली गटात पिंपळघर, सरवली या गावांचा समावेश आहे. तर गोवे गणात पिंपळास, पिंपळघर, गोवे या गावांचा समावेश आहे. जवळच असलेल्या अंजूर गणात दिवे-अंजूर, अंजूर, भरोडी, अलिमघर या गावांचा समावेश आहे. तर वेहळे गणात सुरई-सारंग, वेहळे, पिंपळनेर, पिंपळघर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अंजूर व वेहळे गणाची लोकसंख्या अनुक्रमे १० हजार ४२१ व ८ हजार ४९ इतकी मर्यादित झाली आहे. त्याचवेळी अंजूर जिल्हा परिषद गटाची लोकसंख्या मात्र १८ हजार ४७० इतकी करण्यात आली असून पिंपळास गावचा समावेश अंजूर गटात करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रभाग रचनेत असंख्य त्रुटी आढळल्या आहेत. शासन निर्णयानुसार रांजणोली गटाची लोकसंख्या कमाल लोकसंख्येपेक्षा २४ टक्क्यांहून अधिक आहे तर अंजूर गटाची लोकसंख्या किमान लोकसंख्येपेक्षा १२ टक्क्यांनी कमी आहे. हा दुजाभाव कुणासाठी करण्यात आला आहे, असा सवाल अॅड. सुजित भोईर यांनी केला आहे. पिंपळास गाव अंजूर गटात समाविष्ट केल्यास समतोल राखला जाईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

.. तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावू

कोकण विभागीय आयुक्तांकडे याबाबत तक्रार करण्यात आली असून ते योग्य न्याय देतील, असा विश्वास अॅड. सुजित भोईर यांनी व्यक्त केला तर वस्तुस्थिती दाखवूनही न्याय न मिळाल्यास न्यायाल याचे दरवाजे ठोठावू, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी तालुकाप्रमुख करसन ठाकरे यांनी व्यक्त केली. याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क प्रस्थापित होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.