
रस्त्यावरील असंख्य जीवघेणे खड्डे, धोकादायक पूल, चुकीच्या काँक्रीटीकरणविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले असून त्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. याबाबत पालघरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांची भेट घेत निवेदन देतानाच रस्त्याच्या भयंकर अवस्थेविषयी जाब विचारला.
पालघर जिल्हा स्थापन होऊन जवळपास दहा वर्षे उलटून गेली असली तरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झालेला नाही. बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, मुरबे जेट्टी, मुंबई-अहमदाबाद हायवे त्यातच नव्याने होऊ घातलेला रिलायन्स टेक्स्टाईल पार्क प्रकल्प अशा प्रकल्पांसह विविध विकासकामे सुरू असतानादेखील जिल्ह्याची दुरवस्था कायम आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी, रुग्णवाहिका व सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आत खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख अजय ठाकूर व अनुप पाटील यांनी दिला आहे. यावेळी उधवा धुंदलवाडी रस्ता, चिंचणी परिसरातील रस्ते, सफाळे-वरई मार्गावरील खड्डे, तसेच पारगाव ब्रीजवरील धोकादायक अवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली.
काँक्रीटचे रस्ते जाऊ दे, पुन्हा डांबरीकरणच करा!
मुंबई-अहमदाबाद हायवेचे काँक्रीटीकरण लटकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांना मुंबई गाठण्यासाठी चार-पाच तासांचा कालावधी लागत असून अपघात व जीवितहानीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काँक्रीटीकरण जाऊ दे, पुन्हा डांबरीकरणच करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाल घरवासीयांनी केली आहे.