सापाचा मृत्यू झाल्यानंतरही फण्यातून दंश करत होऊ शकते विषबाधा….जाणून घ्या संशोधनातील निष्कर्ष

पावसाळ्याच्या दिवसात घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात साप आढळतात. मग ते विषारी असो वा बिनविषारी… साप पाहून सगळ्यांचीच पळता भुई थोडी होते. घराच्या आवारात दिसणारा हा सापाने दंश करु नये यासाठी लोक त्याला मारून टाकतात. पण तुम्हाला माहित आहे का सापाच्या कोब्रा आणि क्रेट्स यांसारख्या प्रजाती मृत्यूनंतरही दंश करू शकतात. एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे. यापूर्वी ही क्षमता रॅटलस्नेक आणि कोब्रासारख्या विशिष्ट प्रजातीपुरती मर्यादित होती. मात्र आता आसाममधील संशोधकांनी याबाबत अधिक माहिती  दिली आहे.

द इंडिपेंडेंट या वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त दिले आहे. हे संशोधन अभ्यास फ्रंटियर्स इन ट्रॉपिकल डिसीज या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. आसाममधील नामरूप कॉलेजच्या सुस्मिता ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने विषारी सापांशी संबंधित तीन घटनांची तपासणी केली. यापैकी दोन मोनोक्लेड कोब्रा (नाजा कौथिया) आणि एकामध्ये ब्लॅक क्रेट (बंगारस लिविडस) यांचा समावेश होता. हे दोन्ही साप त्यांच्या मृत्यूनंतर काही तासांत दंश करत विषाबाधा करु शकतात. यासंदर्भात अनेक घटना देखील घडल्या आहेत.

पहिल्या घटनेत, एका ४५ वर्षीय व्यक्तीने त्याच्या घरात कोंबड्यांवर हल्ला करणाऱ्या सापाची हत्या केली. जेव्हा त्या व्यक्तीने सापाचे शरीर फेकून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा सापाच्या कापलेल्या फण्याने त्याला दंश केले. त्याला या दंशानंतर दंश झालेल्या ठिकाणापासून खांद्यापर्यंत तीव्र वेदना जाणवल्या. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याने वारंवार उलट्या होणे, असह्य वेदना होणे आणि चावलेली जागा काळी पडू लागणे अशी लक्षणे दिसली. सापाच्या फोटोवरुन मोनोक्लेड कोब्राने चावल्याचे निश्चित डॉक्टरांनी निश्चित केले.

दुसऱ्या एका घटनेत, भातशेतीत काम करणाऱ्या एका माणसाचा ट्रॅक्टर चुकून एका मोनोक्लेड कोब्रावरून गेला. त्यामुळे त्या सापाचा मृत्यू झाला. ते पाहण्यासाठी जेव्हा तो व्यक्ती खाली उतरला तेव्हा, मृत सापाने त्याच्या पायाला दंश केला. त्यामुळे रुग्णाला तीव्र वेदना, पायाला सूज आणि पाय काळानिळा पडला. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेले असता त्याला रुग्णालयात उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे डॉक्टरांनी योग्य ते उपचार सुरु केले.

दरम्यान या घटनांच्या आधारे संशोधकांना असे आढळून आले की काही सापांच्या विषामुळे आणि त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे ते मृत्यूनंतरही दंश करू शकतात. त्यामुळे जर एखादा साप धडापासून जरी वेगळा झाला असला तरी त्याला स्पर्श केल्यास तो आपल्याला पुन्हा दंश करतो आणि विषबाधा होऊ शकते. त्यामुळे जिवंत साप चावल्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर लक्षणांसारखीच लक्षणे दिसू शकतात.