कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही! फडणवीस, अजितदादांचे नाव घेत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यात दोनदा भाजपचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस दोनवेळा मुख्यमंत्री झाले. पण, फडणवीस आणि अजितदादांच्या या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही. कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही. त्यामुळे आज आपल्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे सांगत नेवासा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली.

नेवासे तालुक्यातील वडुले येथील बाबासाहेब सरोदे नावाच्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांनी थेट सरकारला जबाबदार धरले आहे. मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. या सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या जिवावर मी आजपर्यंत जिवंत होतो. आज तरी कर्जमाफी होईल, उद्या तरी होईल. मी कर्जातून मुक्त होईन. या आशेने मी आजपर्यंत जगत होतो. फडणवीस दोनदा मुख्यमंत्री झाले. पण, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही बोलल्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही, असा आरोप बाबासाहेब सरोदे यांनी केला आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘धर्माधाने अधिक छळले, धनवंतांनी अधिक पिळले, चोर झाले सब’, असे आजचे सरकार झालेले आहे. योग्यवेळी मला जर मदत झाली असती सरकारकडून तर मी नक्कीच माझे आयुष्य जगलो असतो. परंतु आज माझा आत्मविश्वास संपलेला आहे. कर्जबाजार शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे, फडणवीस साहेब! आपलं अस्तित्व सिद्ध करायचे असल्यावर जिवंत माणसामध्ये मारायला लागते, म्हणून मी हा निर्णय घेत असल्याचा बाबासाहेब सरोदे यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.

मी मेल्यावर तरी कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत करा

या जगामध्ये जगायचं म्हटले तर पैशाशिवाय काहीच होत नाही. माझी एकच अपेक्षा आहे, जिवंतपणी जरी नाही काही मदत झाली मला तर मेल्यावर तरी माझ्या कुटुंबीयाला, माझ्यासारख्या कर्जबाजारी शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी, अशी मी कळकळीची विनंती करतो, असं सरोदे यांनी म्हटले आहे.

या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही. ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रियलसाठी आहे. फडणवीस आणि अजितदादांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. म्हणून मला आज आत्महत्या करायची वेळ येत आहे. 

योग्यवेळी कर्जमाफी

शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकर्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. योग्य वेळ आल्यावर शेतकर्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. आमच्या जाहीरनाम्यात याचा समावेश आहे. त्यामुळे योग्य वेळ कधी येणार, ते आम्ही सांगू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

कर्जमाफीसाठी सर्व्हेक्षण सुरू

कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची याबद्दल सर्व्हेक्षण सुरू आहे, अहवाल आल्यावर कोण लाभार्थी याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल. कुणाला कर्जमाफी द्यायची यासंदर्भात सरकारने समिती तयार केली आहे. एक एक घर, एक एक शेतकरी आम्ही तपासणार आहे, असे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.