राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गणपतीआधी पगार

पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱया गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचाऱयांना ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑगस्टचे वेतन कर्मचाऱयांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केले जाणार आहे. या निर्णयाचा फायदा बारा लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱयांना होणार आहे.

हा निर्णय फक्त राज्य सरकारी कर्मचाऱयांपुरता मर्यादित नाही. या शासन निर्णयाची व्याप्ती मोठी आहे. यात जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था, अकृषी व कृषी विद्यापीठे, तसेच त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांचाही समावेश आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी, सर्व संबंधित अधिकाऱयांना वेतनाची आणि निवृत्तीवेतनाची देयके तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिका कर्मचाऱयांनाही पाच दिवस आधी पगार द्या

राज्य सरकारच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांनाही पाच दिवस आधी पगार द्या, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.