विद्यार्थी हत्येवरून अहमदाबादमध्ये वातावरण तापले, हजारो लोक उतरले रस्त्यावर; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

दहावीत शिकणाऱया नयन संघानी या विद्यार्थ्याची आठवीतील एका विद्यार्थ्याने चाकूने सपासप वार करून हत्या केली. या घटनेवरून आज अहमदाबादमधील वातावरण चांगलेच तापले. शाळा प्रशासनावर हलगर्जीपणा आणि पुरावे लपवल्याचे आरोप करत हजारो लोक रस्त्यावर उतरले. एनएसयूआय म्हणजेच नॅशनल स्टुडंड्स युनियन ऑफ इंडिया या संघटनेने शाळेला कुलूप ठोकून विरोध नोंदवला. दरम्यान, या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. अनेकांना ताब्यात घेण्यात आले.

शाळेच्या आवारातच हत्येचा थरार घडला. हल्ल्यात नयन गंभीर जखमी झाला. तो बराच वेळ तडफडत आवारात पडला होता. मात्र शाळेतील कर्मचारी वर्ग आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच रुग्णवाहिकाही बोलावली नाही, असा आंदोलकांचा आरोप आहे.

गुजरात बाल हक्क संरक्षण आयोगाने मागवला अहवाल

दहावीतील विद्यार्थ्याच्या हत्ये प्रकरणी गुजरात बाल हक्क संरक्षण राज्य आयोगाने संबंधित खासगी शाळेकडून अहवाल मागवला आहे. शाळेने या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेविरोधात लोकांकडून संताप होणे नैसर्गिक आहे. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आल्याचे आम्हाला समजले. आता आम्ही या घटनेचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार शाळेवर पुढील कारवाई करण्यात येईल, असे आयोगाच्या अध्यक्षा धर्मिष्ठा गज्जर यांनी सांगितले.