
मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला रोज होणाऱया विलंबामुळे प्रवाशांचे हाल होण्याबरोबर मोटरमनही त्रस्त झाले आहेत. रात्रीची डय़ुटी करणाऱया मोटरमनच्या सहा तासांच्या विश्रांतीला कात्री लागली असून त्यांना जेमतेम चार तास झोप घेऊ दिली जात आहे.
मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवेचा पुरता बोजवारा उडाला. आठ तास सेवा ठप्प झाली. त्यानंतर लोकल धावली, मात्र अर्धा ते पाऊण तासाचा विलंब अनेक गाडयांना होत आहे. परिणामी, सायंकाळी डय़ुटीवर येणाऱया मोटरमनच्या झोपेची अक्षरशः वाट लागली आहे. सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंतची डय़ुटी करणाऱया मोटरमनला शेवटच्या स्थानकात लोकल पोहोचवण्यासाठी 30 ते 40 मिनिटे उशीर होत आहे. नंतर स्थानक वा यार्डमधील विश्रांतीगृहात जायला व फ्रेश व्हायला अर्धा तास जातो.
मोटरमनला लोकल ट्रेनमधील हजारो प्रवाशांची सुरक्षा सांभाळून गाडी चालवावी लागते. मात्र प्रशासन मोटरमनला पुरेशी झोप घेऊ देत नसेल तर अपुऱया झोपेमुळे सकाळी पुन्हा डय़ुटीवर येणाऱया मोटरमनच्या हातून चूक घडण्याची भीती आहे. हा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न आहे, असे मोटरमन संघटनेतील एका पदाधिकाऱयाने सांगितले.