
पालघर जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषद निवडणुकीचे ढोल-ताशे वाजू लागले आहेत. आपल्याच गटाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकून प्रभाग रचना बदलल्याचा खळबळजनक लेटर बॉम्ब भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी टाकला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी शिंदेंनी ही प्रभाग रचना बदलल्याचा आरोप करीत अलका राजपूत यांनी थेट देशाचे सरन्यायाधीश, केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास विभाग यांना पत्र पाठवून न्यायाची मागणी केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पालघर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. पालघरचे मुख्याधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगून पंधरा प्रभागांची रचना आणि हद्द निश्चिती करून तसा अहवाल निवडणूक विभागाकडे प्रसिद्धीसाठी सादर केला. त्यानंतर मिंधे गटाच्या काही नगरसेवकांनी हा अहवाल सादर करताना प्रशासनाने आपल्याला सांगितलेच नाही, अशी तक्रार मनोर येथे आलेल्या एकनाथ शिंदेंकडे केली. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने मुख्याधिकाऱ्यांना बोलावून खडसावले.
४ ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्याधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावणे पाठवले आणि तेथे दबाव आणि दमबाजी करत प्रभाग रचना बदलण्यास भाग पाडले. असे दबावतंत्र वापरताना शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी केला आहे.
पालघर नगर परिषदेचे प्रारूप प्रभाग रचना नियमानुसार झाली आहे. त्यासंदर्भात कुणालाही आक्षेप, हरकती अथवा सूचना असल्यास त्यांनी त्या नोंदवणे अपेक्षित आहे.
– डॉ. इंदुराणी जाखड (जिल्हाधिकारी, पालघर)
भाजपलाही फटका बसणार
एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या उमेदवारांसाठी केलेल्या प्रभाग रचना बदलाचा फटका महायुतीतील भाजप नगरसेवकांनाही बसणार आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री गणेश नाईक यांनी घेतली असून त्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत जाब विचारल्याचे समजते.
मंत्रालयात बोलावून प्रभाग रचना फोडली
एकनाथ शिंदे यांनी प्रभाग रचनेच्या गोपनीयतेचा भंग केला. इतकेच नव्हे तर त्यात छेडछाड आणि गैरप्रकार केले. मनमानी करून जुनी प्रभाग रचना फोडण्यास सांगितले. त्यांच्या बगलबच्च्यांसाठी सोयीची ठरणारी नवी प्रभाग रचना कशी असायला हवी याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आणि नवी प्रभाग रचना मंत्रालयातच फायनल करून घेतली असा बॉम्बगोळा राजपूत यांनी फोडला आहे.
भयंकर.. ५ ऑगस्टला रातोरात प्रभाग रचना बदलली.. प्रस्तावावर मागच्या तारखा टाकून सह्या केल्या
४ तारखेला मंत्रालयातून परतल्यानंतर ५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग सुरू झाली. ५ ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत नवी आणि बेकायदेशीर प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली. दुसऱ्या दिवशी ६ ऑगस्टला मंत्रालयात हा प्रस्ताव मागील तारखांच्या सह्या टाकून देण्यात आला. या प्रारूप प्रभाग रचनेच्या झोलमध्ये मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी हे दोघेही जबाबदार आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली केलेले बदल बेकायदेशीर आणि गोपनीयतेचा भंग करणारे आहेत. या घटनेला जिल्हाधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे ही प्रभाग रचना रद्द करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.