
टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि एकेकाळी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या तोडीस तोड फलंदाजी करणारा विनोद कांबळीची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्याला बोलायला त्रास होत असून नीट चालताही येत नसल्याची माहिती विनोदचा भाऊ वीरेंद्र कांबळीने दिली आहे.
विनोद कांबळी आरोग्याच्या समस्येसह आर्थिक अडचणींमध्ये अडकला आहे. त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचारही करण्यात आले. डिस्चार्जनंतर त्याला अनेक कार्यक्रमांमध्येही तो दिसला. मात्र त्याची प्रकृती पुन्हा खालावल्याची माहिती वीरेंद्र याने ‘द विकी लालवानी’ शोमध्ये दिली.
विनोद सध्या घरी असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहे. विनोदला बोलायला त्रास होत असून त्याला नीट चालताही येत नाही. बरे होण्याची त्याला वेळ लागेल. पण तो चॅम्पियन आहे आणि नक्कीच कमबॅक करेल याची खात्री आहे, असेही वीरेंद्र यांनी म्हटले.
विनोद दहा दिवसांसाठी पुनर्वसन केंद्रात होता. तिथे मेंदूचे स्कॅनिंग आणि यूरिन टेस्टसह संपूर्ण शरिराची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट चांगले आहेत, पण तो चालू शकत नसल्याने त्याला फिजिओ थेरपीचा सल्ला देण्यात आला आहे. तो बरा होण्यासाठी प्रार्थना करा. त्याला चाहत्यांच्या प्रेमाची आणि पाठिंब्याचीही गरज आहे, असेही वीरेंद्र म्हणाला.
सुनील गावसकरांनी शब्द पाळला; विनोद कांबळीला दर महिना 30 हजार रुपये देणार