ट्रम्प यांच्या टॅरिफ गुंडगिरीविरोधात आम्ही हिंदुस्थानसोबत ठामपणे उभे; चीनने अमेरिकेला फटकारले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने जगभरात अशांतता आणि अस्वस्थता आहे. तसेच यामुळे जगाचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. मात्र, रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱ्या चीनबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. हिंदुस्थानसोबत व्यापार करारासाठी ट्रम्प दबावनीती वापरत आहे. ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण म्हणजे गुंडगिरी आहे, त्याविरोधात आम्ही हिंदुस्थानसोबत ठामपणे उभे आहोत, असे चीनने स्पष्ट करत अमेरिकेला फटकारले आहे.

हिंदुस्थानातील चीनचे राजदूत शु फेहोंग यांनी टॅरिफ म्हणजे अमेरिकेची गुंडगिरी असून अमेरिका बऱ्याच काळापासून मुक्त व्यापाराचा फायदा घेत होती. मात्र, आता ते टॅरिफचा शस्त्रासारखा वापर करत आहेत, असेही चीनने म्हटले आहे. अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्क्यांपर्यंत शुल्क लादले आहे आणि चीन त्याचा तीव्र विरोध करत आहे. ते म्हणाले की हिंदुस्थानवर लादलेल्या या मोठ्या टॅरिफवर मौन बाळगल्याने अमेरिकेच्या गुंडगिरीला बळकटी मिळेल. त्यामुळे आम्ही हिंदुस्थानच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे शु फेहोंग म्हणाले.

भारतीय वस्तूंसाठी चीनची बाजारपेठ खुली करण्याबाबत फेहोंग म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या देशात वस्तू विकण्यात प्रचंड वाढ झाली आहे. चीनच्या बाजारपेठेत अधिकाधिक भारतीय वस्तूंच्या विक्रीचे आम्ही स्वागत करतो. हिंदुस्थान आयटी, सॉफ्टवेअर आणि बायोमेडिसिन क्षेत्रात आघाडी मिळवत आहे. तर चीन इलेक्ट्रॉनिक उत्पादन, पायाभूत सुविधा आणि नवीन ऊर्जा क्षेत्रात विस्तार करत आहे. त्यामुळे भारतीय व्यावसायिकांनी चीनमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी अशी आमची इच्छा आहे. तसेच चिनी व्यावसायिकांनाही हिंदुस्थानात गुंतवणूक करण्यासाठी चांगले वातावरण मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.