
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाने तीन सदस्यीय विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. या एसआयटीचे अध्यक्ष पद आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे देण्यात आले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय नांदेड परिक्षेत्र यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेवरून दंगल उसळली होती. दंगलखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी घराघरात घुसून निष्पापांना अटक केली होती. यात कायद्याचे विद्यार्थी असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता, न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मारहाणीतच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी या मारहाणीबद्दल मिठाची गुळणी धरली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर देताना सूर्यवंशी यांचा मृत्यू हा मारहाणीमुळे नाही तर त्याला असलेल्या आजारपणामुळे झाल्याचे म्हटले होते. मात्र त्यांच्या अंगावर असलेल्या मारहाणीच्या खुणा शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आल्या होत्या. सरकारने सूर्यवंशी कुटुंबियांना 10 लाखाची मदत देऊ केली होती. मात्र सूर्यवंशी कुटुंबियांनी ती मदत नाकारली होती. या प्रकरणात तेथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आले होते. याबाबत उच्च न्यायालयात सूर्यवंशी कुटुंबियांच्या वतीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिका दाखल करुन सदर प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती.
नांदेडच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला होता. 30 जुलै रोजी अखेर मोंढा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला. अद्यापपर्यंत या गुन्ह्यात कुणालाही अटक करण्यात आली नाही. केवळ एक अनोळखी आरोपी असा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एसआयटी स्थापन करा, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे पोलीस महासंचालकांना आदेश
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश देऊन सीबीआयकडून महाराष्ट्रात आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सुधीर हिरेमठ हे सध्या विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग या पदावर कार्यरत आहेत. समितीत त्यांच्या समवेत नागपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अभिजित धाराशिवकर आणि गुन्हे अन्वेषण विभाग नांदेड येथील पोलीस उपअधीक्षक अनिल गवाणकर हे सदस्य राहणार आहेत. ही समिती गठण करत असताना परभणी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे.
हिरेमठ जे या विशेष तपास पथकाचे अध्यक्ष आहेत. ते अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनात काम करतील. 2007 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी सुधीर हिरेमठ2023 मध्ये सीबीआय येथे कार्यरत होते.