PKL 2025 – ‘यू मुंबा’ची नवीन जर्सी लॉन्च, 10 वर्षानंतर पुन्हा विजेतेपद पटकावण्याचा निर्धार

प्रो. कबड्डी लीगचा बारावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 30 ऑगस्टपासून कबड्डीचा थरार सुरू होणार आहे. याच निमित्ताने दुसऱ्या हंगामात विजेतेपद पटकावलेल्या यू मुंबाने नवीन जर्सी लॉन्च केली. मुंबईत एका कार्यक्रमामध्ये संघमालक रोनी स्क्रूवाला, सीईओ सुहैल चंडोक, कर्णधार सुनील कुमार आणि अनिल चपराना यांच्या उपस्थितीत नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली. यावेळी कर्णधार सुनील कुमारने 10 वर्षांपूर्वी ‘यू मुंबा’ने मिळवलेल्या जेतेपदाची पुनरावृत्ती करणार, असा निर्धार व्यक्त केला.

यू मुंबाने अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली 2015 मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र संघाच्या कामगिरीचा आलेख खालावत गेला. गेल्या वर्षी सुनील कुमारकडे नेतृत्व आल्यानंतर त्याने संघाची चांगली बांधणी करत प्ले ऑफ पर्यंत पोहोचवले. त्यामुळे गेल्या 10 वर्षापासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी यू मुंबाचा संघ उत्सुक आहे.